आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात नागरिकांचा संताप:240 घरांचे सांडपाणी निमखेडी शिवारातील मनुदेवी हौसिंग सोसायटीत; ड्रेनेज, रस्ते करण्याची मागणी

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुदेवी हौसिंग सोसायटीत रस्ते, गटारी करण्याची गरज आहे. पावसाळ्यात शहराचा या परिसराशी संपर्क तुटतो. येथील घरे जमिनीलगत असल्याने पावसाळ्यात पाणी सरळ घरात येत असल्याने येथील नागरिकांची अधिक दयनीय स्थिती होते. त्यातच सुकृती ड्रिम प्रोजेक्टच्या 240 घरांचे सांडपाणीही निमखेडी शिवारातील मनुदेवी हौसिंग सोसायटीत (आहुजानगर) वाहून येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत येथील रहिवाशांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन देत पाहणी करण्याची विनंतीही केली.

हा परिसर खोल खड्ड्यात असल्याने व येथील घरे जमिनीलगत असल्याने पाण्याचा हा लोंढा सरळ येथील रहिवाशांचा घरात धडकतो. या परिसरात गटारी, रस्ते नसल्याने पावसाळ्यात येथील रस्ते निसरडे होतात. त्यातच निमखेडी शिवारातील प्रभाग 10 मध्ये बांधकाम केलेल्या सुकृती ड्रिम होमच्या 240 घरांचे सांडपाणी राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला निमखेडी शिवारातील गट नं. 121, प्लॉट. नं. 27 प्रभाग 8 मध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या अंडरपासमधून येते. हे पाणी सरळ मनुदेवी हौसिंग सोसायटीत येते. येथे बैठे घरे असल्याने पावसाळ्यात या पाण्याचा अधिक त्रास होतो.

पावसाळ्यात घरांत पाणी शिरते

मनुदेवी हौसिंग सोसायटी राष्ट्रीय महामार्गालगत आहे. या सोसायटीत बैठ्या घरांची संख्या अधिक आहे. पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गाच्या अंडरपास खालून मोठ्याप्रमाणात पाणी वाहून येते. यातच सुकृती ड्रिम होमच्या 240 घरांचे सांडपाणीही असते. या परिसरात रस्त्यांची देखील दयनीय स्थिती असल्याने पावसाळ्यात येथील नागरिकांचा संपर्क शहराशी तुटतो. तसेच आहुजानगर, मनुदेवी सोसायटीच्या थांब्याजवळ डांबरीकरण झालेले नाही, असे मनुदेवी हौसिंग सोसायटी रहिवासी पीतांबर कोळी म्हणाले.

रस्ते, गटारी होण्याची गरज

मनुदेवी सोसायटी परिसरात रस्ते गटारी होण्याची गरज आहे. या परिसरात रस्ते, गटारी नसल्याने शहराचा या परिसराशी संपर्क तुटतो. कच्च्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात. त्यातच या परिसरात गटारी नसल्याने हा परिसर सतत चिखलाने वेढला जातो. या रस्त्यांमुळे दुचाकी देखील घरातून बाहेर पडू शकत नाही, असे मनुदेवी हौसिंग सोसायटी रहिवासी जयश्री असोदेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...