आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोकेदुखी:रामनगरात गटारीचे पाणी थेट घरात; अळ्या, दुर्गंधीने नागरिक वैतागले; नागरिक सकाळी उठल्याबरोबर स्वत: साफ करतात गटारी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रामनगरात साचलेल्या गटारीचे पाणी बाथरूममार्गे घरात शिरून सर्वत्र अळ्या पसरत आहेत. या अळ्यांमुळे इतर संसर्गजन्य आजारांना निमंत्रण मिळत आहे. या परिसरातील नागरिकांचे सकाळी उठल्याबरोबर पहिले काम म्हणजे घरासमोरील गटारी साफ करण्याचे असते. त्यानंतरच येथील नागरिक अंघोळीसह इतर कामांकडे वळतात. रामेश्वर कॉलनी परिसरातील रामनगरात मोठ्या प्रमाणात गटारींची दुरवस्था झाली आहे. येथील रस्त्यांचे डांबरीकरण झाल्याने गटारी ह्या जमिनीच्या खाली गेल्या आहेत. या परिसरात गटारींची कामेच झाली नसल्याने एखादा दुचाकी वाहक रस्त्याच्या कडेला गेला तर त्याचे वाहन सरळ गटारीत घसरते. तसेच या गटारींचा निचराच होत नसल्याने त्या पूर्णत: गाळाने भरल्या आहेत. पालिकेचे गटारी काढणारे १५ दिवसांनंतर एखाद्या दिवशी येऊन वरवर गटार काढत असल्याने पाण्याचा निचराच होत नसल्याने तसेच येथील घरे रस्त्याच्या खाली गेल्याने नळांच्या पाण्याच्या दिवशी गटारीचे पाणी सरळ कंपाउंड, बाथरूममध्ये जाते. या पाण्याला दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात येते. तसेच पाण्यातून येणाऱ्या अळ्या ह्या घरातही येतात. त्यामुळे येथील गटारींची कामे करावीत अशी मागणी परिसरातील संतप्त नागरिकांनी ‘दिव्य मराठी’च्या माध्यमातून मनपाकडे केली आहे.

आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला ^परिसरातील अनेक घरे ही रस्त्याच्या खाली गेली आहेत. येथे रस्त्याचे काम झाले असले तरी गटारीचे काम होणे गरजेचे आहे. रामनगरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील गटारी ह्या संपूर्णत: गाळाने भरल्या आहेत. पालिकेच्या नळांच्या पाण्याच्या दिवशी गटारीचे पाणी हे पोर्चमध्ये येते. तसेच गटारी लगत असलेल्या पाइपद्वारे देखील पाणी बाथरुमपर्यंत येत असल्याने घरात दुर्गंधी सुटते. तसेच या पाण्यातून अळ्या देखील चालत येत घरात शिरतात. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. - बंडू सोनवणे, रामनगर

^आमचे घर गटारींच्या शेवटच्या टोकाला आहे. येथून पाणी वाहून जाण्यास जागाच नसल्याने रोज या परिसरात पाणी तुंबून राहते. दररोज या गटारीच्या पाण्याला जाण्यासाठी वाट करून देणे हेच आमचे पहिले काम असते. हॉटेल कस्तुरीपासून रामनगरात पाणी वाहून येते. तसेच रस्ता देखील अतिशय निमुळता झाल्याने रहदारीस देखील अडथळा होतो. - समीर पिंजारी, रामनगर

बातम्या आणखी आहेत...