आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकत्र कुटुंबात सामाईक जागेअभावी एकापेक्षा जास्त भावंडांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी सुटल्या आहेत. कारण केंद्र शासनाने आता एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना बहुमजली इमारत उभारून लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील ५०० पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या भावंडांना एकाच ठिकाणी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त भावंडे असल्याने सामाईक जागेवर पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यावरून वाद निर्माण होत असतात. त्यामुळे प्रत्येक जण आपणच वारसदार असल्याचे दाखवून लाभ मिळवण्यासाठी धडपडत असतात. जागेचा प्रश्न अन् महागाईचा विचार करता उंच इमारतींचा पर्याय योग्य ठरतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना पात्र ठरवण्यात आले आहे. यात लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीच्या जागेवर घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिले जाते आहे. पात्र कुटुंबातील सज्ञान कमावता व्यक्ती हादेखील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलासाठी पात्र ठरवण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय झाला. त्यात एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त पीएमएवायचे लाभार्थी असल्यास व त्यांची जागा सामाईक असल्यास अशा पात्र लाभार्थ्यांना पीएमएवायचा लाभ घेणे शक्य व्हावे यासाठी त्यांना सामाईक जागेवर बहुमजली इमारत बांधण्यासाठी आता परवानगी देण्यात येणार आहे.
मनपाच्या माध्यमातून घरकुलांच्या लाभार्थ्यांचे ११७१ प्रस्ताव पात्र आहेत. यातील २५३ घरे बांधण्यात येत आहेत. तर उर्वरित प्रस्तावांना नगररचना विभागाकडे बांधकाम परवानगीसाठी सादर केले आहेत. यामुळे एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त भावंडांना एकाच ठिकाणी इमारत बांधून स्वतंत्र मालकी हक्काने राहता येणार आहे.
--
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.