आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गमित्रने केले निरीक्षण:गाडेगाव शिवारात ओढ्यावर स्थलांतरीत दगडी गप्पीदास, आशियाई मासेमार, श्वेतकंठीचे दर्शन

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाडेगाव शिवारात एक आेढा वाहताे आहे. यंदा या ठिकाणी हिवाळ्यात युराेपीय देश व हिमालयाकडून स्थलांतरीत करणारे दगडी गप्पीदास, आशियाई मासेमार, काॅमन सँडपायपर, श्वेतंकठी यासह ४५ प्रजातीच्या पक्ष्यांचे दर्शन झाले आहे. पक्षी सप्ताहानिमित्त निसर्गमित्र जळगावतर्फे शुक्रवारी ग्रामीण युवकांसाठी पक्षी निरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात या पक्ष्यांची नाेंद घेण्यात आली. पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ व राजेंद्र गाडगीळ यांनी या उपक्रमाची माहिती दिली.

दरवर्षी निसर्गमित्र जळगावतर्फे वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांचा जन्म दिवस व पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा केला जाताे. त्यानिमित्त या वर्षी गाडेगाव येथील ओढयावर पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामीण युवकांना प्रथम पक्षी सप्ताहाबद्दल त्यांनी माहिती दिली. फिल्ड गाइडच्या माध्यमातून पक्ष्यांची माहीती व ओळख करून दिली. पक्षी निरीक्षणात वैभव बऱ्हाटे, मनीष भारंबे, योगेश बऱ्हाटे, दीपक पाटील, जयेश धांडे, नारायण वराडे, रितेश पाटील, नितीन शिनगारे, श्रावण नेहेते, बाळू महंगडे या युवकांनी पक्षी निरीक्षण उपक्रामत सहभाग घेतला.

हे आहेत आढळलेले स्थलांतरीत पक्षी पक्षी निरीक्षण दरम्यान पांढऱ्या भुवईचा धोबी, पांढरा धोबी, करडा धोबी, पिवळा धोबी, गुलाबी मैना, दगडी गप्पीदास, काळा थीरथिरा, श्वेतकंठी, तपकिरी आशियाई मासेमार, सामान्य तुतारी या हिवाळी पाहुण्यांची नोंद करण्यात आली. त्यांच्या अधिवासाची माहिती उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आली.

पाणवठे तुडुंब म्हणून पक्ष्यांची संख्या यंदा कमी देशभरात यंदा पाऊस जाेरदार झाला. परिणामी पाणवठे तुडुंब भरलेले आहेत. स्थलांतरीत पक्ष्यांचा अधिवास वाढण्यासाठी दलदल लागते; पण ती अजून तयार झालेली नाही. जसजसे पाणवठे आटतील तसतशी ती तयार हाेईल. अर्थात, त्यांना लागणारे शंख, शिंपल्यांचे खाद्य उपलब्ध हाेईल. साधारणत: डिसेंबरपर्यंत अशी स्थिती निर्माण हाेऊ शकते. त्यानंतर पक्ष्यांची संख्या वाढेल. - राजेंद्र गाडगीळ, पक्षीमित्र तथा अभ्यासक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...