आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरानंतर ग्रामीणभागात चोरट्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. या आठवड्यात चोरट्यांनी भादली येथे सात घरे फोडली होती. गुरुवारी मध्यरात्री शिरसोली येथे मिर्ची फॅक्टरी व शिक्षक कॉलनीतील नवीन वस्तीमध्ये चोरट्यांनी ६ घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनामुळे पोलिसांनी ग्रामीणभागात गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिरसोली येथे गुरुवारी रात्री १ ते दीड वाजे दरम्यान चोरट्यांनी ही घरे फोडून सुमारे ३ लाखांचा ऐवज लांबवला आहे. चोरट्यांनी पुनमचंद विठ्ठल देवरे यांचा घरून ५०० रोख व चांदीचे देव, राजेंद्र बारी यांच्या घरातून १५०० रुपये रोख, महेंद्र चव्हाण यांच्या घरातून ५० हजार रोख रक्कम व २३ ग्रॅम सोन्याची दागिने, योगेश देशमुख यांच्या घरातून १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख, सपना गोंधळी यांच्या घरातून ५० हजार रुपये रोख, ३ ग्रॅम सोन्याचे दागिने व एक मोबाइल असा ऐवज लुटून नेला आहे. तसेच सुधीर भाऊराव पाटील यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरांनी केला होता. महेंद्र चव्हाण हे रेल्वेत आहेत. ते दापोरा येथे आपल्या गावी गेले होते. त्यांनी रात्री घरी येण्याचा कंटाळा केला. तर योगेश देशमुख हे दवाखान्याच्या कामानिमित्त जळगाव येथे थांबून होते ही संधी साधून चोरट्यांनी घरात चोरी केली. घटनेची माहिती पोलिस पाटील शरद पाटील व श्रीकृष्ण वराडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याला दिल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्य पोलीस अधीक्षक कुमार चिथा, पोलिस निरीक्षक विजय शिंदे हे श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले; पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तीन दिवसापासून अनोळखी महिला, पुरुषांचा वावर : शिरसोली येथे गेल्या तीन दिवसापासून परिसरात कपडे विकणारे पुरूष व बागड्या विकणाऱ्या महिला फिरत होत्या. यातील पुरुषांनी एका घरासमोर थांबून पाणी मागितले होते. ते दुचाकीवर आले होते, अशी माहिती नागरिकांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.