आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागिरणा नदीपात्रातील वाळूतस्करी थांबण्याचे नाव घेत नसल्याने चिंता वाढली आहे. पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी शनिवारी सायंकाळी महामार्गावर उतरून दहा डंपर जप्त केले होते. मात्र, असे असले तरी दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी निमखेडी व बांभोरीजवळ नदीपात्रातून वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू होती. इतकेच नव्हे तर या भागातील काटेरी झुडपांआड नऊ ठिकाणी वाळूचा साठा केलेला असल्याचे रविवारी ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत समोर आले.
पोलिस उपअधीक्षक चिंथा यांच्या कारवाईमुळे वाळूतस्करांना जरब बसेल असे वाटले होते; पण तसे झाले नाही. त्याचे कारण म्हणजे रविवारीही गिरणा काठावर तस्करांनी झुडपांआड लपवला वाळूचा साठा, धाक संपला नदीपात्रातील पाण्यातून वाळूचा उपसा दिवसाढवळ्या सुरू होता. पोलिस व महसूल यंत्रणेचा धाक संपल्याचे त्यातून अधोरेखित होते आहे. केवळ बांभोरी गावाजवळील नदीपात्रातूनच वाळूचोरी केली नाही, तर निमखेडीजवळ एक ट्रॅक्टर नदीत उतरलेले होते. तर दोन ट्रॅक्टर रस्त्याने वाळू वाहतूक करताना आढळून आले. एका ठिकाणी तर वाळूचा उपसा करण्यासाठी सुमारे १० ते १५ मजूर सुमारे चार फूट पाण्यात उतरून वाळू उपसा करीत होते. नदीत तयार केलेल्या रस्त्याने ट्रॅक्टर थेट पाण्यापर्यंत पोहोचवले होते.
आज पोलिस कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेता नदीतून काढलेली वाळू थेट शहरात आणली जात नव्हती. तर गिरणा नदीकाठावर असलेल्या मोठ्या झुडपांमध्ये वाळूचा साठा केला गेला आहे. काही ठिकाणची सर्व वाळू उचलली आहे. चार ठिकाणी ढिगारे कायम होते. पोलिस, महसूलची कारवाई थांबल्यानंतर रात्रीच्या अंधारात ही वाळू शहरात विविध ठिकाणी आणण्याचे नियोजन माफियांकडून केले गेले आहे. झुडपांमध्ये लपवलेल्या ढिगाऱ्यांमुळे चोरट्यांचे फावते आहे. हा नवीन फंडा वापरून वाळू वाहतूक होते. पोलिस कारवाई सुरू असूनही मुजाेर वाळूचोरांनी रविवारी न जुमानता चोरी सुरूच ठेवल्याचे निदर्शनास आले.
नदीत तयार झाल्या कपारी : जेसीबी, पोकलँड मशीनने बेसुमार वाळू उपशामुळे नदीत ठिकठिकाणी मोठ्या कपारी तयार झाल्या आहेत. या कपारींमध्ये अडकून बालकांचे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना पूर्वी घडलेल्या आहेत. सध्या उन्हाळा सुरू असल्याने रविवारी निमखेडी परिसरातील अनेक लहान मुले पोहोण्यासाठी नदीपात्रात आले होते. भविष्यात या कपारी पोहणाऱ्यांचा जीव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रविवारी तस्करीचे प्रमाण असते जास्त : वाळूचोरी रोखण्यासाठी महसूल विभागाने भरारी पथकांचीही नियुक्ती केली आहे. मात्र, असे असले तरी बांभोरी पुलाच्या शेजारीच वाळूचे उत्खनन सुरू असते. पुलापासून ५०० मीटर अंतरापर्यंत गौणखनिज उत्खननाला बंदी आहे. परंतु, पुलापासून १०० फूट अंतरावर उत्खनन सुरू असल्याचे समोर येते आहे. रविवार शासकीय सुटीचा वार असल्याने वाळूतस्करी दुप्पट होत असते.
रस्त्यांवर एक फुटापर्यंत धुळीचे थर
निमखेडी गावाकडून नदीपात्राकडे जाणाऱ्या तीन ते चार रस्त्यांवर एक फूट उंचीपर्यंतचे धुळीचे थर साचले आहेत. अवजड डंपर, ट्रॅक्टरच्या वाहतुकीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. या मुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो आहे. धुळीमुळे या परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांचे त्रास वाढले आहेत. पावसाळ्यात याच धुळीचा चिखल होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.