आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद:जळगाव एसटी विभागात लवकरच 6 महिला चालकांच्या हाती बसचे सारथ्य; 8 पैकी 6 जणी अंतिम चाचणी परीक्षेत उत्तीर्ण

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव विभागात लवकरच 6 महिला चालकांच्या हाती एसटीचे सारथ्य येणार आहे. 8 पैकी 6 जणी चालक भरतीतील अंतिम चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.

एसटी महामंडळात सन २०१९मध्ये महिला चालकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या महिला चालकांच्या भरती प्रक्रियेत आठ महिला चालक पात्र ठरण्यात आले होते. या सर्वच महिलांचे नुकतेच प्रशिक्षण पूर्ण झाले. मात्र, केवळ अंतिम चाचणी परीक्षा बाकी असल्याने या महिला चालकांचा नियुक्तीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, नाशिकहून आलेल्या अधिकाऱ्यांनी जळगाव ते अजिंठा अशी या महिला चालकांची अंतिम परीक्षा घेतली. यात सहा महिला चालक अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले.

महिला चालकांसाठी या आधीही १३ मार्चला नाशिक येथे अंतिम चाचणी परीक्षा होणार होती. त्यानंतर या २० मार्चला देखील जळगावी होणारी चाचणी परीक्षा रद्द झाल्याने अजून या अंतिम चाचणी परीक्षेसाठी या महिलांना किती वाट पहावी लागेल हे सांगता येत नव्हते. मात्र, २८ मार्च रोजी नाशिकचे अरुण सिया, प्रशांत पद्मने यांनी जळगावी येऊन या सर्व महिलांची चाचणी घेतली. त्यानंतर हा चाचणी अहवाल नाशिकहून आलेल्या अधिकाऱ्यांनी जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना सादर केला.

या चाचणी परीक्षेत सुषमा बोदडे, माधुरी भालेराव, संगीता भालेराव, मनीषा निकम, सुनीता पाटील, शीतल अहिरराव या सहा महिला पात्र ठरल्याचे विभाग नियंत्रक जगनोर यांनी सांगितले.

प्रत्येकी ३० किलोमीटरपर्यंत अंतिम चाचणी

प्रत्येक महिला चालकाची ३० किलोमीटरपर्यंत अंतिम चाचणी घेण्यात आली. यात जळगाव ते अजिंठा, त्यानंतर पाचोरामार्गे पुन्हा जळगाव अशी या सर्व महिलांची अंतिम चाचणी घेण्यात आली. यात अजिंठा डोंगररांगातूनही या महिला चालकांची चालवण्याची क्षमता तपासण्यात आली.