आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंख्याशास्त्र विभागात अनेक रोजगाराच्या संधी आहेत. भारतासह परदेशातही या विषयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, या विषयाकडे अत्यंत कमी संख्येने विद्यार्थी वळतात. त्यात विद्यार्थिनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवतात. बेसिक गोष्टींचे ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. यावरच त्यांचे भविष्य अवलंबून असणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना हेच ज्ञान अवगत करण्यासाठी ‘आयएसपीएस’ सोसायटी काम करत असून भविष्यात याच सोसायटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध योजना व उच्च शिक्षणात विविध अभ्यासक्रमांत संख्याशास्त्राचा योग्य प्रमाणात अंतर्भाव ठेवण्याचे कार्य केले जाणार असल्याचे आयएसपीएसचे उपाध्यक्ष तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. एल. शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. प्रश्न : आयएसपीएस ही सोसायटी म्हणजे काय, तिचे सभासद किती? उत्तर : इंडियन सोसायटी फॉर प्रॉबेबिलिटी अँड स्टॅटिस्टिक म्हणजे आयएसपीएस. ही देशपातळीवरील सोसायटी अाहे. त्यात संख्याशास्त्र व निगडित विषयांतील भारत व परदेशातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, सरकारी, निमसरकारी, खासगी व क्षेत्रात संख्याशास्त्रीय सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी असे दाेन हजार सभासद सध्या या साेसायटीचे आहेत. प्रश्न : आयएसपीएस सोसायटीचे कार्य नेमके काय, ते कसे चालते? उत्तर : सोसायटीमार्फत देशभरात परिषदा हाेतात. सभासदांनी विशेष संपादन केलेले गौरव, पुरस्कार, परिषदांमार्फत घेण्यात आलेली माहिती ई-न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून प्रकाशित केली जाते. सोसायटी दरवर्षी विविध पुरस्कार देते. आयएसपीएसद्वारे संख्याशास्त्र, प्रॉबेबिलिटी, डाटा सायन्स व संंबंधित विषयांवर निगडित परिषदा देशभरात विद्यापीठे, संस्था घेतात. प्रश्न : संख्याशास्त्रातील शिक्षणाच्या भारतातील स्थितीबद्दल काय? उत्तर : भारतात दरवर्षी १० ते १२ हजार विद्यार्थी हे एमएस्सी स्टॅटिस्टिक पदवी प्राप्त करतात. यात संख्याशास्त्रात डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक, सॅम्पल सर्व्हे आणि सॅम्पलिंग थेरी, प्रॉबेबिलिटी डिस्ट्रिब्युशन, स्टॅटिस्टिकल इन्फेरन्स हे पायाभूत विषय आहेत. संख्याशास्त्रातील इतर जवळपास वीस विषय हे या विषयांवर आधारित आहे. भारतासह परदेशात संख्याशास्त्राच्या पदवीधरांना व संख्याशास्त्राचे चांगले आकलन असलेल्या इतर पदवीधरांना संधी आहे. अभ्यासक्रमात ८० टक्के थिअरी,२० टक्के प्रात्यक्षिके असणे गरजेचे अाहे. प्रश्न : संख्याशास्त्रात रोजगाराच्या संधी सध्या उपलब्ध आहेत काय? उत्तर : संख्याशास्त्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. याकडे अनेक विद्यार्थी वळतातदेखील. मात्र, पायाभूत विषयांवरील अभ्यास पुरेसा झालेला नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येतात. काही विद्यार्थ्यांना नोकरी मिळतेदेखील, मात्र त्यात अधिक काळ काम करता येत नाही. पुरेसे ज्ञान घेणे आवश्यक आहे. प्रश्न : संख्याशास्त्र अभ्यासक्रमात कोणते बदल व्हावेत असे वाटते? उत्तर : संख्याशास्त्र विषयाचा योग्य वापर करून अभ्यासक्रमात नियमित प्रोजेक्ट्स करून घ्यावे. संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना एक पूर्ण विषय संख्याशास्त्रावर असावा. अनेक विद्यापीठ आजही कॅल्क्युलेटरचा वापर करतात मात्र प्रात्यक्षिके ही संगणकावरच व्हावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.