आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी राज्यभरात संपाची घाेषणा करण्यात आली आहे. महसूल व जिल्हा परिषदेचे कर्मचारी पूर्ण ताकदीने संपात सहभागी हाेणार आहेत. इतर विभागांनीही संपाला पाठिंबा दिला असला तरी प्रत्यक्षात संपात उतरणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आराेग्य, साफसफाई आदी नागरी सेवा सुविधांवर परिणाम हाेण्याची शक्यता नाही.
दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढत संपात सहभागी हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मंगळवारच्या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. संपात कर्मचारी सहभागी हाेऊ नयेत यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी महापालिका आयुक्तांसह शासकीय विभागांना पत्र पाठवले आहे.
कंत्राटी कामगारांची घेणार मदत, बारकाईने नियाेजन
संप काळात दहावी, बारावीच्या परीक्षेचे काम विचलित होणार नाही, यासाठी जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे. मंगळवारी बारावीचा पेपर आहे. तर बुधवारी दहावीचा भूमितीचा पेपर आहे. विना अनुदानित शिक्षक, कंत्राटी कामगारांची मदत घेऊ संपात सहभागी कर्मचाऱ्यांऐवढेच कर्मचारी काम करतील असे सांगण्यात आले.
सिव्हिलमध्ये उपचार सुरू, रुग्ण परत जाणार नाहीत
जीएमसी रुग्णालयातील नर्सेसही काळ्या फिती लावून काम करणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इतर काेणत्याही कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी हाेणार असल्याचे पत्र दिलेले नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विजय गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे मेडिकल काॅलेज व सिव्हिलमध्ये उपचारांवर काेणताही परिणाम हाेणार नाही.
नागरी सुविधांवर परिणाम नाही, स्वच्छता नियमित
महापालिकेच्या १४०० कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला आहे; परंतु कर्मचारी प्रत्यक्षात संपात उतरणार नाहीत. त्यामुळे मनपाचे कामकाज सुरू राहील. संपामुळे साफसफाई, नागरी सुविधांवर काेणताही परिणाम हाेणार नाही. सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय घेंगट यांनी संपाला पाठिंबा असल्याचे सांगितले. काेणत्याही प्रकारे काम बंद ठेवले जाणार नाही.
आज होमगार्ड उघडणार जिल्हाधिकारी कार्यालय
महसूलचे जिल्ह्यात सुमारे दाेन हजारावर कर्मचारी आहेत. मंगळवारपासून ते बेमुदत संपावर जातील. संपात किती कर्मचारी सहभागी होतील याबाबत मंगळवारी माहिती घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी कर्मचारी कामावर असतील. जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शाखांची कार्यालये हाेमगार्ड उघडतील. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे तयार केलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.