आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना संसर्गामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने ऑनलाइन अभ्यासक्रम सुुरू होता. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आता शाळा सुरू झालेल्या आहेत; मात्र ऑफलाइन अभ्यासक्रम शिकत असताना अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून एका विद्यार्थ्याने आत्मघातकी पाऊल उचलले आहे. अभ्यासाचे आकलन न होणे, प्रात्यक्षिके, अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई व पाठांतर हाेत नसल्याच्या तणावात गुरुवारी सायंकाळी इंद्रप्रस्थ नगरात राहणाऱ्या सेंट लॉरेन्स स्कूलच्या नववीत शिकणाऱ्या चौदा वर्षांच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
प्रेम प्रवीण सोनवणे (वय १४, रा. इंद्रप्रस्थनगर, जळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रेम हा संेट लॉरेन्स स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होता. घटनेबाबत त्याचे वडील प्रवीण सोनवणे यांनी माहिती दिली. सोनवणे हे जिल्हा मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी दोन दिवसांची सुटी घेतलेली होती. प्रेमची गेल्या तीन दिवसांपासून परीक्षा सुरू होती. गुरुवारी त्याचा चौथा पेपर झाला. पेपर संपल्यानंतर सोनवणे हे त्याला दुपारी १२ वाजता शाळेतून घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर थकवा घालवण्यासाठी त्याला ज्यूस, ग्लुकॉन डी दिले. सुटी असल्यामुळे घरगुती कामे करण्यासाठी सोनवणे हे बाजारात गेले होते. त्या वेळी घरात प्रेम, त्याची आई व लहान बहीण असे होते.
सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सोनवणे यांना शेजाऱ्याने मोबाइलवर संपर्क साधत तातडीने घरी येण्यास सांगितले. ते दुचाकीवर घरी येत होते. त्या वेळी त्यांना रिक्षामधून नातेवाइकाने हात दिला. प्रेमला शेजारी व नातेवाईक रुग्णालयात घेऊन जात होते. त्या वेळी त्याने गळफास लावून घेतल्याची माहिती सोनवणे यांना मिळाली. त्याला लगतच्या खासगी डॉक्टरांना दाखवले. त्यांनी तातडीने रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिल्यानंतर खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रेमने बेडरूममध्ये खुर्चीवर उशी ठेवून छताला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्या वेळी आई व बहीण समोरील खोलीत होत्या. प्रेमने आत्महत्या केल्याचे त्याच्या लहान बहिणीच्या निदर्शनास आले.
घरी नेलेला मृतदेह पुन्हा शासकीय रुग्णालयात आणला
खासगी रुग्णालयात प्रेम याला मृत घोषित केल्यानंतर नातेवाइक मृतदेह घरी घेऊन गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक आर. एस. क्षीरसागर, सोनार यांच्यासह रवींद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर चिमुकल्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणला. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान बहीण व आजी असा परिवार आहे.
लहान बहीण म्हणाली, तो तीन-चार दिवसांपासून एकटा-एकटा राहत होता
परीक्षेवरून घरी आल्यानंतर तो कुत्र्यासोबत खेळला. तो असे करेल असे वाटतच नव्हते. आत्महत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी त्याचा मोबाइल, वह्यांसह इतर वस्तूंची तपासणी केली. त्यामध्ये काही आढळून आले नाही. लहान बहिणीला विचारले. त्या वेळी कळले की चार दिवसांपासून तो एकटा-एकटा राहत होता. केलेला अभ्यास आठवत नाही. पाठांतर होत नाही. शाळेत जास्त अभ्यास करावा लागतोे. ते जमत नसल्याचे त्याने लहान बहिणीला सांगितले होते, असे सोनवणे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.