आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदरांजली:ना.धों.च्या कवितेतली संवेदनशीलता सुलाेचना महानोरांनी जगण्यात जपली; शेती अन् साहित्याचा तोल सांभाळला

जळगाव / शंभू पाटीलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुलोचना महानोर यांचे वृद्धापकाळाने निधन; पळसखेडा येथील शेतीमध्ये घेतला शेवटचा श्वास

सुप्रसिद्ध कवी पद्मश्री कविवर्य ना. धों. महानोर यांच्या पत्नी सुलोचना महानोर (वय ७९) यांचे १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पळसखेडा येथील शेतातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. पाच महिन्यांपासून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पती ना.धों.महानोर, मुले डॉ.बाळासाहेब महानोर, गोपाळ महानोर व तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुलोचना महानोर यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ नाट्य कलावंत शंभू पाटील यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत...

सुलोचना महानोर आमच्या सगळ्यांच्या लाडक्या काकू आज निघून गेल्या. आयुष्यभर सगळं सोसून, दुःखाचे कढ सतत पिऊनही ज्यांची प्रसन्नता कधीच कमी झाली नाही, त्यांच्या अगत्यशील स्वागताने महानोर दादांचं घर नेहमीच स्वागतशील झालं. कवितेत असणारी संवेदनशीलता जगण्यात जपणं हे अवघड काम काकूंनी आयुष्यभर केलं. शेती, मातीत काम करणाऱ्या बायांचं आयुष्य मातीच होतं; पण याच मातीतून सोनं’ पिकतं, सर्जनशील निर्मिती होते. काकूंचं महानोर दादांच्या आयुष्यात असणं, त्यातून महानोरांची कविता उमलणं याचा काय संबंध आहे, हे महानोर दादाच उलगडू शकतील; पण पानझड या काव्यसंग्रहाची अर्पणपत्रिका याची साक्ष आहे.

झाडाच्या आधारे वेल वाढते; पण वेलीच्या आधारे झाड वाढलं .... काकूंसाठी लिहिलेली अर्पणपत्रिका हे सगळं व्यक्त करते. अगदी लहान वयात लग्न होऊन काकू घरात आल्या. न कळत्या वयात चूल आली, ते आटोपून शेतात काम करणं, भलं मोठं खटलं, त्या सगळ्यांचं करायचं. अगदी सासूचं बाळंतपणदेखील. नवरा एकीकडे शेती तर दुसरीकडे पुस्तकांच्या जगात. सासऱ्यांनी एक दिवस कवितेची पुस्तकं जाळून टाकली. हे आपलं काम नही रे, रिकामे धंदे करू नको, आपलं आपलं काम पाह्य असं बजावलं. महानोरांवर हा मोठा आघात होता. इथेच काकूंचं मोठेपण. ह्या कवीला त्यांनी तेव्हापासून जपलं. शेती व साहित्य या दोन जगांचा तोल या बाईने बरोबर सावरला. या दोन जगांचा आस बनून घर सावरलंच, पण महानोर दादांना पण जपलं. कुठून आली असेल ही समज ? एकीकडे शेतमजूर, गावातली माणसं, गणगोत हे जग तर दुसरीकडे यशवंतराव चव्हाण, शरद पवार, भवरलालभाऊ जैन असं जग. या दोन्ही जगात त्या सहज वावरल्या. हे कसं जमलं त्यांना ? नवरा इतका मोठा त्याचा कधी गर्व नाही की मी हे सगळं सांभाळलं असा भाव नाही. सहज, सोपं जगणं, वागणं, बोलणं यामुळेच त्या पटकन सगळ्यांना आपलंसं करून घ्यायचा. इतक्या निर्मळ हसायच्या की आपल्यातली पण नकारात्मकता नाहीशी व्हावी. ज्यांच्यासाठी सगळं केलं ती अनेक माणसं उलटली, कृतघ्न झाली; पण तरी कधी बोलण्यात कटुता आली नाही.

बातम्या आणखी आहेत...