आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेचा खोळंबा:सुरत-भुसावळ पॅसेंजर जळगावला येण्याआधीच रद्द; खान्देशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांच्या आनंदावर विरजण

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम रेल्वेने मोठा गाजावाजा करून ८ जूनपासून सुरू केलेली सुरत-भुसावळ गाडी जळगावला येण्याआधीच रद्द झाली. यामुळे खान्देशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह चाकरमानी व सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी

तब्बल अडीच वर्ष कोरोनामुळे बंद असलेली सुरत-भुसावळ पॅसेंजर गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अचानक गाडी रद्द करण्याचा निर्णय वेस्टर्न रेल्वेने घेतला आहे. याबाबतचे पत्र भुसावळ विभागाला प्राप्त झाल्याने रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

गाडीचा मुहूर्त पुन्हा लांबला

गाडी क्रमांक 19005 सुरत-भुसावळ पॅसेंजर ही गाडी 8 जून रोजी रात्री 11.10 वाजता सुरत स्थानकातून सुटणार होती; तर दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी 7.55 मिनिटांनी भुसावळ स्थानकात पोहोचणार होती. मात्र, गाडी क्रमांक 19005 ही गाडी सुरत स्थानकातून सुटण्याआधीच रद्द केल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. तसेच गाडीबाबत माहितीच सिस्टीममधून काढून टाकल्याने कुठेही बुकिंग झाले नसल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. खान्देशातून सुरतकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गाडी क्रमांक 19006 भुसावळ-सुरत सुरू होण्याबाबत मोठी प्रसिद्धी मिळाली होती. तसेच 5 जूनपासून या गाडीच्या बुकिंगलाही सुरुवात झाल्याचे ही गाडी सिस्टिममधून काढून टाकेपर्यंत अनेकांनी बुकिंग केल्याचे सांगण्यात येत. पश्चिम रेल्वेकडून तांत्रिक अडचणी आल्याने ही गाडी रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.

कुठेही बुकिंग नाही ...

गाडीबाबत सिस्टीममधून माहिती काढून टाकल्याने व कुठेही बुकिंग झाली नसल्याने रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र, गाडी सुरू होणार असल्याचा आधीच मोठा गाजावाजा करण्यात आला. अनेकांनी ऑनलाइन व तिकीट खिडकीवरून बुकिंग केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, किती लोकांनी बुकिंग केले याची आकडेवारी मिळू शकली नाही. ज्यांनी ऑनलाइन बुकिंग केले असेल त्यांना ऑनलाइनच पैसे रिफंड होतील.

विदर्भ, खान्देशकर नाराज

भुसावळ-सुरत गाडीमुळे खान्देश, विदर्भातील प्रवाशांची मोठी सोय होणार होती. खान्देशातील अनेकांचे नातलग गुजरातमध्ये आहेत. तसेच व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह चाकरमानींच्या सोयीची ही गाडी होती. यात जळगाव, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, नरडाणा, शिंदखेडा, दोंडायचा, नंदुरबार या खांदेशातील शहरांसह विदर्भातील अमरावती, मलकापूर, नांदुरा, अकोला, शेगाव तसेच मध्य प्रदेशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांनाही या गाडीची प्रतीक्षा होती.

असे होते गाडीचे थांबे ...

गाडी क्रमांक 19006 भुसावळ-सुरत पॅसेंजर 9 जूनपासून भुसावळहून सायंकाळी 7.30 वाजता सुटणार होती. ही गाडी जळगाव, पाळधी, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, व्यारा, बारडोली, उधना व सुरत स्थानकात गाडीचे थांबे होते.

बातम्या आणखी आहेत...