आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययाेजना:महिनाभरात 22 हजार घरांचे सर्वेक्षण, शहरात 857 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. दाटवस्तीपासून ते थेट काॅलनी भागात रुग्ण आढळत आहेत. पालिकेने महिन्याभरात केलेल्या तपासणीदरम्यान ८५७ घरांत डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. डास उत्पत्ती हाेत असलेले ९४० भांडी रिकामी करण्यात आली आहेत. जनजागृती आणि नियंत्रणासाठी केवळ १६ कर्मचारी कार्यरत असून, एका दिवसाच्या कामाला आता दाेन ते तीन दिवस लागत असल्याने डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्याचे माेठे आव्हान प्रशासनासमाेर आहे.

काेराेनाच्या दाेन वर्षाच्या काळात डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर काेराेना सेंटरमध्ये उपचार केले जात हाेते. दरम्यान, काेराेनाचा प्रभाव आेसरल्यानंतर पुन्हा डेंग्यू आजाराने डाेके वर काढले आहे. मनपाने १ आॅक्टाेबरपासून शहरात सर्वेक्षणाला सुरुवात केली हाेती. महिनाभरात झालेल्या तपासणीनंतर शहरातील डेंग्यू उत्पत्ती केंद्र किती झपाट्याने वाढत आहेत हे स्पष्ट करते. महापालिका मलेरिया विभागाच्या माध्यमातून १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान २४ दिवसांत सर्वेक्षण करण्यात आले. यात २२ हजार २०५ घरांची तपासणी पथकातर्फे करण्यात आली.

महिनाभरात २२ हजार घरांचे सर्वेक्षण, शहरात ८५७ ठिकाणी...
त्यात ८५७ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. ५५ हजार ३९३ भांड्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९४० भांड्यांमध्ये अळ्या आढळून आल्या आहेत. २० हजा ८७३ भांड्यांमध्ये अॅबेटिंग करण्यात आले आहे.सर्वेक्षणासाठी मनुष्यबळ कमी : महापालिकेच्या मलेरिया विभागात दरवर्षी फवारणी, धुरळणी, अॅबेटिंगसाठी ५० ते ६० कर्मचारी नियुक्त केले जायचे. यंदा केवळ १६ कर्मचारी कार्यरत आहेत. दाेन प्रभाग एका दिवसात अॅबेटिंग हाेत हाेते. आता मनुष्यबळ कमी असल्याने एका प्रभागासाठी दाेन ते तीन दिवसांचा कालावधी लागताे आहे. यामुळे सर्वेक्षणाच्या कामाला गती मिळत नसून दूषित घरे व भांड्यांचा शाेध घेण्याचे काम संथगतीने सुरू आहे. पर्यायाने डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ हाेण्याची शक्यता आहे.

काॅलनी भागात वाढताहेत रुग्ण : गेल्या महिन्यात पंधरा दिवस फाॅगिंग करण्यात आले. यात ११३४ घरांमध्ये धुरळणी करण्यात आली आहे. शहरातील अयाेध्यानगर, खाेटेनगर, महाबळ परिसरात सर्वाधिक डेंग्यू संशयित रुग्ण असल्याची माहिती समाेर आली आहे. या भागाशिवाय मास्टर काॅलनी, मेहरूण, उदय काॅलनी, जाकीर हुसैन काॅलनी, फातेमानगर, प्रेमचंदनगर, बळीरामपेठ, त्र्यंबकनगर, पार्वतीनगर, ज्ञानदेवनगर, नवीपेठ, शाहुनगर, यशवंतनगर, लक्ष्मीनगर, एमआयडीसी, समतानगर, आंबेडकर मार्केट परिसर, रामद्वार पार्क, आेमशांती नगर या भागात संशयित आढळल्याने फाॅगिंग करण्यात आले.

डेंग्यू संशयित रुग्णांचे रक्त नमुने मलेरिया विभागाकडून धुळे येथील हिरे मेडिकल काॅलेज येथे पाठवण्यात येतात. त्याचा अहवाल प्राप्त झाला. आॅक्टाेबरच्या १०७ नमुन्यांपैकी ४० रक्त नमुने डेंग्यू पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त आहे. हा शासकीय आकडा असला तरी प्रत्यक्षात डेंग्यू संशयितांची संख्या ७००पेक्षा जास्त असल्याची माहिती शहरातील जनरल फिजिशियनकडून मिळते आहे.

बातम्या आणखी आहेत...