आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीत महागाई:स्वेटर, मफलर, कानटाेपी, जॅकेटसह हातमाेजे यंदा 10 टक्क्याने महागले

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा पावसाळा उशिरा संपला असून, गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाताना गरम कपडे, मफलर, कानटोपी वापरताना नागरिक दिसू लागले आहे. तसेच शहरात गरम कपड्यांची दुकानेही थाटण्यास सुरुवात झाली आहे. यंदा गरम कपड्यांमध्ये पारंपरिकसह असंख्य नवीन प्रकार बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे. यात बुलबुल, फैदर, मखमल वूल या नवीन प्रकारांना खरेदीदारांकडून पसंती मिळत आहे. तसेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १० टक्के गरम कपड्यांच्या किमती वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

शिवतीर्थावर तिबेटियन व महाराष्ट्रीयन विक्रेत्यांनी गरम कपड्यांची दुकाने थाटली आहेत. यात स्वेटरमध्ये १५० ते ९०० रुपयांपर्यंत स्वेटर विक्रीला उपलब्ध आहेत. तसेच जॅकेट व इतर काही वेगळ्या प्रकारच्या गरम कपड्यांच्या किमती २ ते ३ हजार दरम्यानही पाहायला मिळतात. यंदा बाजारात जॅकेट, स्वेटर्स, बिनबाह्यांचे स्वेटर्स, महिलांसाठी लोकरी कोट, लहान मुलांसाठीचे जॅकेट्स आदी प्रकारचे गरम कपडे उपलब्ध आहेत; मात्र यात बुलबुल वूल, फैदर वूल, मखमल वूल या प्रकाराला अधिक पसंती दिली जात असल्याचे तिबेटियन विक्रेत्या सिरिन युडून यांनी सांगितले. तसेच मफलर, टोप्या, कानटोप्या, कानपट्ट्याही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. शिवतीर्थ मैदानावर दरवर्षी ३५च्या वर महाराष्ट्रीयन व तिबेटियनची दुकाने थाटली जातात. यंदा मात्र, तिबेटियन व्यावसायिकांनी दुकाने थाटण्यात आघाडी घेतली आहे.

या कपड्यांना वाढती मागणी : मोठ्या व्यक्तींसाठी असलेल्या ‘टू इन वन’ जॅकेटच्या किमती ६०० ते १ हजार रुपयांपर्यंत असून, महिलांचे कोट ५०० ते ६०० रुपयांपर्यंत तर लोकरी स्वेटर्स २५० ते ९०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. लहान मुलांचे जॅकेट्स आणि स्वेटर्सही २५० ते ९०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी माकड टोपी आणि कानटोपीला लोकांची जास्त पसंती मिळत आहे. तर महिलाही स्वेटर्सबरोबर स्कार्फचीही मागणी यंदा वाढली असल्याचे उबदार कपडे व्यावसायिक युडून यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...