आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफांचा लाक्षणिक बंद:सोन्याला गुणवत्तेचा कस; राज्यभरात कोट्यवधींची उलाढाल झाली ठप्प

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेन्याच्या गुणवत्तेची हमी देण्यासाठी दाेन महिन्यांपूर्वी लागू केलेल्या हाॅलमार्किंग सक्तीच्या विराेधात साेमवारी राज्यभरात सराफांनी लाक्षणिक बंद पाळला. सोने व्यापाऱ्यांसाठी एका देशात दाेन वेगवेगळे नियम लागू करणे, यंत्रसामग्रीचा अभाव आणि सोने व्यापाऱ्यांना गुन्हेगाराप्रमाणे दंडाची तरतूद करणे या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. दरम्यान, इंडिया बुलियन अॅँड ज्वेलर्स ही दागिने विक्रेत्यांची संघटना संपात सहभागी झाली नव्हती.

जून २०२१ पासून केंद्र सरकारने देशातील ७४१ पैकी २५६ जिल्ह्यात सोन्याच्या दागिन्यांवर हाॅलमार्क सक्तीचा केला आहे. महाराष्ट्रातील गाेंदिया, चंद्रपूर, बुलडाणा, हिंगाेली, परभणी आदी १४ जिल्ह्यांना हाॅलमार्कच्या सक्तीतून वगळण्यात आले आहे. या धोरणाला सोने व्यापारी संघटनेचा विरोध आहे. देशातील एक तृतीयांश व्यापाऱ्यांना वेगळा नियम आणि इतरांना मात्र सवलत हे अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. हाॅलमार्कसाठी पुरेशी यंत्रसामग्री देशात उपलब्ध नाही. दरम्यान, राज्यात सोन्याची कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली.

दिव्य मराठी एक्सपर्ट व्ह्यू : चेतन राजापूरकर, संचालक इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स
हाॅलमार्किंग फायद्याचे पण, ह्यूड अव्यावहारिक
हाॅलमार्किंग ग्राहक व व्यापारी दाेघांसाठी चांगले आहे; परंतु त्याला जाेडण्यात आलेले हाॅलमार्किंग युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (ह्यूड) ही ट्रॅकिंग सिस्टिम ग्राहक व व्यापारी या दाेघांसाठी त्रासदायक आहे. त्यामुळे दोघांचा वेळ वाया जाईल. ह्यूडसाठी लागणारा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना पडेल. प्रत्येक दागिन्यावर युनिक क्रमांक असेल. ताे क्रमांक कुठूनही ट्रॅक हाेऊ शकेल. त्यामुळे त्याचा गैरवापर हाेण्याची भीती आहे. हा क्रमांक मिळवण्यासाठी दीड ते दाेन तासांचा अवधी लागेल. दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी वापरण्यात येणारी सँपल कट या पद्धतीने दागिना डॅमेज हाेण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यात ७ काेटींची उलाढाल ठप्प
हाॅलमार्किंगच्या विराेधात राज्य सराफा संघटनेने पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील सराफांनी १०० टक्के सहभाग नाेंदवला. शहरातील दीडशे, तर जिल्ह्यातील सुमारे २ हजार सराफी पेढ्या बंद हाेत्या. दिवसभरात शहरात तीन ते साडेतीन, तर जिल्ह्यात सुमारे ७ काेटी रुपयांची उलाढाल साेमवारच्या लाक्षणिक बंदमुळे ठप्प झाल्याचा दावा जिल्हा सराफ असाेसिएशनचे अध्यक्ष गाैतम लुणिया यांनी केला आहे.

हाॅलमार्किंग गुणवत्तेसाठी योग्यच आहे. त्याला कुणाचाही विरोध नाही; परंतु शासन पायाभूत सुविधा न पुरवता व्यापाऱ्यांवर ट्रॅकिंगद्वारे नियंत्रण आणू इच्छिते. त्याचबरोबर कारकुनी स्वरूपाची कामे लादून इन्स्पेक्टर राज लागू करू पाहत आहे. त्याला विरोध आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम होणार आहे. - फत्तेचंद राका, अध्यक्ष, राज्य सराफ असोसिएशन.

साेन्याची गुणवत्ता तपासण्यासाठी राज्याला किमान ३ हजार हाॅलमार्क यंत्रांची गरज आहे. प्रत्यक्षात ९०० हाॅलमार्क मशीन कार्यान्वित आहेत. अशा स्थितीत हाॅलमार्किंगसाठी व्यापाऱ्यांचे दागिने ३ ते ४ दिवस पडून राहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...