आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारावेर व यावल तालुक्यातील १५ शेतकऱ्यांची ९६ एकर शेती सावकारी अधिनियमांतर्गत ८ सावकारांच्या कचाट्यातून जिल्हा उपनिबंधकांनी ३० नोव्हेंबर रोजी सोडवली. त्यांच्या आदेशानुसार १५ दिवसांत तलाठ्यांनी सावकारांच्या महसूल नोंदी रद्द करुन ७।१२ उताऱ्यावर त्या शेतकऱ्यांची नावे लावणे अपेक्षित होते. मात्र, आदेशानंतरही तलाठ्यांनी सावकारांची नोंद रद्द करण्यास शेतकऱ्यांना नकार दिला. त्यानंतर डीडीआरने उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करुन नोंदी करण्याची सूचना केली. आताही ग्रामपंचायत निवडणुकांनंतर सावकारांच्या नोंदी रद्द करण्याचा मुहूर्त उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
12 वर्षे सावकारांविरुद्ध लढा
रावेर व यावल तालुक्यातील ८ सावकारांनी संबंधित पंधरा शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रती महिना ३ टक्के व त्यापेक्षा अधिक व्याजान पैसे दिले होते. त्याची परतफेड करु न शकल्याने या शेतकऱ्यांची ९६ एकर शेती दस्त नोंदवून नातेवाईकांच्या नावावर केली होती. याबाबत शेतकऱ्यांनी बारा वर्षे सावकारांविरुध्द लढा दिला. जिल्हा उपनिबंधकांनी ४७ सुनावण्या घेतल्यानंतर सावकारी अधिनियमांतर्गत शेतकऱ्यांना शेती परत करण्याचे आदेश सावकारांना दिले. त्या आदेशांची प्रत घेऊन शेतकरी रावेर व यावल तालुक्यातील तलाठ्यांकडे गेले. मात्र, सावकारांच्या महसूल नोंदी रद्द करुन ७।१२ उताऱ्यावर शेतकऱ्यांच्या नावांच्या नोंदी घेण्यास त्यांना नकार दिला.
आदेशानंतरही कार्यवाही नाही
महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत झालेल्या आदेशात नमूद दस्तानुसार सावकारांनी केलेल्या महसुली नोंदी रद्द करुन मुळ अर्जदाराच्या नावाने त्या मिळकतीची नोंद करणे अपेक्षित आहे. तलाठ्यांना आदेश प्राप्त होवूनही अद्याप कार्यवाही केलेली नाही. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल, असे तलाठ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी फैजपूरचे उपविभागीय अधिकारी कडलग यांना पत्र लिहिले आहे.
7। 12 प्रती, ताबा पावतींसह कार्यपूर्ती अहवाल मागवला
आदेशानुसार अवैध घोषित करुन रद्द करण्यात आलेल्या खरेदीखताच्या दस्तानुसार घेण्यात आलेल्या फेरफार नोंदी रद्द करण्यात याव्यात. ७।१२ वर मुळ मालकाच्या नावाची नोंद घेण्यात यावी. शेताची ताबा पावती मुळ मालकास देण्यात यावी. केलेल्या कार्यवाहीचा कार्यपूर्ती अहवाल घेण्यात आलेल्या ७।१२ च्या प्रतीसह व ताबा पावतीसह पंधरा दिवसांच्या आत जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर करावा, असे डीडीआर यांनी पत्रात नमूद केले आहे.
या गावातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी घेतल्या नाहीत नोंदी
यावल, कुसुंबे (ता. रावेर), चिनावल (ता.रावेर), कोचुर बुद्रुक (ता. रावेर), कुंभारखेडा (ता. रावेर), लुमखेडे (ता. रावेर), उदळी बु. (ता.रावेर), उदळी खुर्द (ता. रावेर), हंबर्डी (ता. यावल), दुसखेडा.(ता. यावल), चिंचाटी (ता. रावेर), फैजपूर (ता. यावल)
निवडणुकीनंतर होतील नोंदी
सावकारी अधिनियमांतर्गत झालेले आदेश घेऊन शेतकरी आलेले होते. ते आदेश तलाठ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे महसूल अधिकारी, कर्मचारी व्यस्त आहेत. या निवडणुकीनंतर त्या शेतकऱ्यांच्या नोंदी घेतल्या जातील, असे फैजपूरचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.