आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोर पाटलांच्या गडात ठाकरे:युवासेनाप्रमुख आदित्य शनिवारी जळगावात, शिवसैनिकांशी साधणार संवाद

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री तथा युवासेवाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा स्थगित झालेला जळगाव जिल्हा शिवसंवाद दौरा 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. आदित्य शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील तीन आमदारांच्या मतदार संघात शिवसंवाद साधणार आहेत.

ठाकरे यांचा 9 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील शिवसंवाद दौरा नियोजित होता. त्या अनुषंगाने शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी तयारी केलेली होती. या दौऱ्यात शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन करण्याचेही नियोजन झाले होते. त्याबाबत नियोजनाच्या बैठकाही पार पडल्या होत्या. मात्र, ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांचा दौरा स्थगीत केल्याचे 7 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले होते.

ठाकरे जिल्ह्यात येणार होते, त्याच दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर जिल्ह्यात आलेले पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात शक्तीप्रदर्शन केले. गुलाबराव संपला, असे म्हणणाऱ्यांनी आता पाहावे, असे आव्हानही त्यांनी दिलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर 20 ऑगस्ट रोजी आदित्य जळगाव दौऱ्यावर येत आहेत.

रॅलीमध्ये ढोल-ताशा पथके

शनिवारी सकाळी 10ः40 वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. विमानतळावर त्यांचे युवासेना जळगाव ग्रामीणतर्फे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर त्यांचे अजिंठा चौफुली येथे त्यांचे स्वागत करण्यात येईल. इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डीमार्ट चौक, शिरसोली रस्त्याने पाचोरा येथे जाणार आहेत. आकाशवाणी चौकात शिवसेना व युवासेनेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. रॅलीमध्ये ढोल-ताशा पथके राहणार आहेत.

गुलाबराव, किशोर पाटलांच्या मतदार संघात शिवसंवाद

शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले आमदार किशोर पाटील यांच्या पाचोरा मतदार संघात दुपारी 12 वाजता आदित्य शिवसंवाद साधणार आहेत. दुपारी 1ः45 वाजता पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात शिव संवाद साधतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदार संघातील पारोळा येथे ते शिवसंवाद साधणार आहे. त्यांच्या दौऱ्याबाबत शिवसेना व युवासेनेकडून नियोजन करण्यात येत आहे. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात आदित्य काय संवाद साधतात, याबाबत उत्सुकता आहे.

बातम्या आणखी आहेत...