आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:जळगावात रुग्णालयाच्या शाैचालयात आढळला बेपत्ता काेराेनाबाधित वृद्धेचा मृतदेह

जळगाव9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ५ जूनपासून सुरू होता शोध, मृतदेह पाच दिवस पडून

जळगावच्या काेविड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उपचार घेत असलेली ८२ वर्षीय वृद्ध महिला ५ जूनपासून बेपत्ता झाली होती. या बेपत्ता झालेल्या वृद्धेचा मृतदेह बुधवारी सकाळी कोविड रुग्णालयातील सात नंबर वॉर्डातील शौचालयात आढळला. ५ दिवस हा मृतदेह तेथे पडून होता. शौचालयाचा दरवाजा आतून बंद होता. बुधवारी दुर्गंधी आल्याने दरवाजा तोडल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.  विशेष म्हणजे शौचालयात या वृद्धेचा शोध  घेतला होता, अशी माहिती अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी तीन दिवसांपूर्वी दिली होती. ते आज तोंडघशी पडले.

मूळ भुसावळ येथे राहणारी ही वृद्धा १ जून रोजी सायंकाळी सात वाजता कोविड रुग्णालयात दाखल झाली. वृद्धेच्या कुटुंबातील एका महिलेचा कोरोनामुळे एक दिवसापूर्वीच मृत्यू झाला होता. यानंतर २ जून रोजी वृद्धा कोविड रुग्णालयातून बेपत्ता झाली. डॉक्टरांनी कुटुंबीयांना तशी माहिती देऊन शोध सुरू केला. ३ जून रोजी ही वृद्धा पुन्हा रुग्णालयात आली होती. यानंतर ५ जून रोजी ही वृद्धा पुन्हा एकदा बेपत्ता झाली. दोन दिवस कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. यानंतर जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद केली होती. बुधवारी सकाळी डॉ. किरण पाटील हे नियमित राऊंडसाठी सात नंबरच्या वॉर्डात गेले हाेते. या वेळी शौचालयाजवळ दुर्गंधी आल्याने त्यांनी उपस्थित नर्स व स्वच्छता कर्मचाऱ्यांना विचारणा केली. शौचालयाची कडी आतून बंद होती. सफाई कर्मचाऱ्यांना बोलावल्यानंतर हा दरवाजा तोडण्यात आला. या वेळी आतील दृश्य मन हेलावणारे होते. शौचालयात तिचा मृतदेह आढळला. यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून ओळख पटवली. सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर बुधवारी या वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तीन दिवसांपूर्वी शौचालयात घेतला होता शोध :

७ जून रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्रकार परिषदेत हा विषय चर्चेला आला होता. पत्रकारांनी बेपत्ता वृद्धेच्या बाबतीत विचारणा केली होती. या वेळी तेथे उपस्थित असलेले वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी शौचालय, बाथरुममध्ये तिचा शोध घेतल्याचे सांगून वेळ मारुन नेली होती, म्हणजेच कोणत्याही प्रकारची चौकशी न करता डॉ. खैरे यांनी खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले.

सफाई ठेकेदार, अधिपरिचारिका प्राथमिक चौकशीत दोषी

ही घटना समोर आल्यानंतर दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कोविड रुग्णालयात तातडीची बैठक घेतली.  या ७ क्रमांकाच्या वॉर्डाची जबाबदारी असलेली एक अधिपरिचारिका व सफाई ठेकेदार या दोघांवर प्राथमिक चौकशीत ठपका ठेवण्यात आला आहे. या दोघांना बैठकीत बोलावण्यात आले होते. तेथे त्यांच्याकडून तोंडी जबाब घेण्यात आले आहे. या शिवाय आणखी काही जण यात दोषी आढळून येण्याची शक्यता आहे. 

वृद्धेच्या सुनेचा कोरोनाने झालाय मृत्यू :

या वृद्धेच्या सुनेचा १ जून रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर मुलासही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने मुलाने कोरोनावर मात करून सध्या तो बरा झाला आहे; परंतु सुनेचा मृत्यू झाला. यानंतर वृद्धेस लागण होऊन तिला काेविड रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या एका मुलाचा मृत्यू नऊ वर्षांपूर्वी झाला आहे. वृद्धेच्या पश्चात  एक मुलगा, एक सून व दोन नातवंडे असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...