आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाठीहल्ला:कर्मचाऱ्याचा मृतदेह दूध संघात आणला, पाेलिसांचा लाठीहल्ला ; आर्थिक मदत पुरेशी नसल्याने कुटुंबीय असमाधानी, दाेन तास परिसरात तणाव

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावनजीक महामार्गावर शुक्रवारी विचित्र अपघात झाला. त्यात जिल्हा दूध संघाचा कंत्राटी कर्मचारी असलेला जळगावच्या शिवाजीनगरातील धनराज सुरेश सोनार (वय ३७) याचा मृत्यू झाला. इच्छा नसताना त्याला दबाव टाकून डबल ड्युटी करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे दूध संघाने त्याची पत्नी व मुलींच्या नावे २५ लाखांची मदत द्यावी, पत्नीला नोकरी द्यावी या मागणीसाठी सायंकाळी थेट मृतदेह दूधसंघाच्या प्रवेशद्वारात आणल्याने तणाव वाढला. पोलिसांनी लाठीहल्ला करून जमावाला पांगवल्याने आणखी गोंधळ वाढला.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा पथकासह घटनास्थळी आले. त्यांनी एमआयडीसी, जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी बोलावून घेतले. रात्री नऊ वाजेपर्यंत व्यवस्थापकांशी चर्चा करुनही केवळ ५० हजार रुपये मदत व पत्नीस कंत्राटी पद्धतीने नोकरीवर ठेवण्याचे लेखी आश्वासन मिळाले. या मदतीने कुटंुबीय, नातेवाईक समाधानी नव्हते. तरी मृतदेहाची विटंबना न करता अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांनी मृतदेह घरी नेण्याचा निर्णय घेतला. कुटंुबीय गेटवर पोहोचताच तेथे हजर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी चर्चा काय झाली याची विचारणा केली? मिळालेली मदत पुरेसी नव्हती, माणुसकीची भावना दूध संघाने ठेवली नाही असा निष्कर्ष काढून कर्मचारी आक्रमक झाले. पोलिस बंदोबस्ताची पर्वा न करता संतप्त कर्मचाऱ्यांनी धनराजचा मृतदेह उचलून दूध संघाच्या आवारात आणल्याने तणाव निर्माण झाला.