आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला कोविड काळात केवळ ३१ हजार रुपये रोख स्वरूपात, १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १४९० पीपीई किट आणि १०४५ मास्क एवढीच साधने देणगी स्वरूपात मिळाली आहेत. त्यामुळे त्या काळात असंख्य देणगीदारांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात देणगी देऊन मदत केल्याच्या चर्चेत फारसे तथ्य नसल्याचे समोर आले आहे.
माहितीच्या अधिकारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या माहितीत वरील देणग्यांचा उल्लेख केला आहे. एक एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात या रुग्णालयाला कोणी काय वस्तू, सेवा व पदार्थ देणगी स्वरूपात दिले, याचा तपशील त्यांच्याकडे मागण्यात आला होता. त्यानुसार शल्यवस्तू खरेदी विभाग, भांडार विभाग आणि रोखपाल विभागाकडून स्वतंत्र तपशील त्यांनी उपलब्ध करून दिला आहे.
रोख रक्कम आणि पीपीई किट
राजेश श्यामराव चौधरी यांच्याकडून रुग्णालयाला ३१ हजार रुपये रोख देणगी स्वरूपात देण्यात आले आहेत. २३ एप्रिल २०२१ रोजी ही देणगी देण्यात आली असून, ती रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा केली आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडून ९०, आर्या फाउंडेशनचे धर्मेंद्र पाटील यांच्याकडून ९०, रोटरी क्लबचे डॉ. राजेश पाटील यांच्याकडून ३०, जीएम फाउंडेशनकडून २४०, व्हॉइस ऑफ इंडियाच्या श्रीमती दमानिया यांच्याकडून २००, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांकडून ४००, एसबीआय लाइफ इंशुरन्सच्या मुख्य व्यवस्थापकांकडून ७०, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जळगाव शाखेकडून २५० आणि इकरा कॉलेजकडून १२० पीपीई किट रुग्णालयाला मिळाल्याची नोंद आहे. याशिवाय व्हॉइस ऑफ इंडियातर्फे एक हजार मास्क आणि आर्या फाउंडेशनतर्फे ४५ एन ९५ मास्कही देण्यात आल्याची नोंद आहे.
..तर ‘दिव्य मराठी’ला कळवा
या देणगीदारांशिवाय आणखीही काही देणगीदार असे असतील ज्यांनी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला देणगी स्वरूपात रोख रक्कम किंवा काही वस्तू, पदार्थ वा सेवा दिली असेल पण त्यांचा उल्लेख या वृत्तात आला नसेल त्यांनी दिलेल्या देणगीबाबतचा तपशील ‘दिव्य मराठी’ला ८३९०९०३०७८ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर कळवावा.
कॉन्सन्ट्रेटर वापराविना राहिले
देणगी स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या वापराबाबतचा तपशीलही मागवण्यात आला होता. त्यात देणगीचे मिळालेले १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरात आलेले नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लान्ट कार्यरत झाल्यामुळे या कॉन्सन्ट्रेटर्सचा वापर झाला नाही, असेही कळवण्यात आले आहे. ‘धरणगाव एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम वर्ल्ड व्हिजन’ या संस्थेने ७ जुलै २०२१ रोजी हे यंत्र रुग्णालयाला देणगी स्वरूपात दिले आहेत. एका यंत्राची किंमत ७८,८५० रुपये असून, १५ यंत्रांची एकत्रित किंमत ११ लाख ८२,७५० रुपये आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.