आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या ‘हरे कृष्ण’ या गौडिय वैष्णव संप्रदायाच्या धार्मिक संघटनेने भुसावळ रोडवरील मन्यारखेडा शिवारात एक एकरच्या जागेवर श्रीकृष्णांच्या इस्कॉन मंदिराचे काम सुरू केले आहे. या जागेवर संत निवासासह किचनचे काम ३० टक्के पूर्ण झाले असून, दीड वर्षात मंदिराचे बांधकाम पूर्ण हाेणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त चैतन्य जीवनदास महाराज यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. देशभरातील विविध शहरांप्रमाणे जळगावातही भव्य इस्कॉन मंदिर व्हावे, या उद्देशाने इस्कॉनच्या जुहू (मंुबई) येथील संस्थेअंतर्गत महामार्गाला लागूनच अर्ध्या किलोमीटरवरील मन्यारखेड्यात मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे.
सुनील मंत्री यांनी संस्थेस मंदिरासाठी ही जागा उपलब्ध करून दिली आहे. इस्कॉन मंदिराचा फलकही या जागेवर लावण्यात आला आहे. भाविकांच्या देणगीमधून सध्या भक्त निवासासाठी चार खोल्या, किचन, १०० भक्तासंाठी सत्संग हॉल बांधण्यात आला आहे. भक्तिमार्ग हा सर्वात महत्त्वाचा असे ही संघटना मानते. हिंदू धर्माचे महत्त्व आणि आध्यात्मिक जीवनातील आनंद समजावण्याचे काम हरे कृष्ण संप्रदाय करत असते. शहरातील शंभरपेक्षा अधिक कुटुंबे या संप्रदायाशी जुळली गेली आहेत. पिंप्राळ्यात इस्कॉनचे २० वर्षांपासून सेंटर सुरू आहे. या ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम हाेतात.
भाविकांचे सहकार्य
मंदिराच्या उभारणीस भाविकांकडून उत्स्फूर्त सहकार्य मिळत आहे. देणगीदारांच्या सर्वतोपरी मदतीतून हे मंदिर उभारले जाणार आहे. जिल्ह्यातील हे पहिले आकर्षक इस्कॉन मंदिर असणार आहे. इस्कॉनच्या विविधांगी कार्यात युवकांचाही चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
एक हजार भाविकांसाठी भव्य सभामंडप उभारले जाणार आहे. मंदिरासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च यासाठी अपेक्षित असून भाविक व देणगीदारांच्या दातृत्वातून ही कामे केली जाणार आहेत. मंदिरात राधाकृष्णाच्या तीन फूट मूर्तीसह बलराम व गौर निताईच्या आकर्षक मूर्ती असणार आहेत. २४ फूट उंच घुमट हे मंदिराचे वैशिष्ट असणार आहे. यासाठी आराखडा निश्चित करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.