आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • The Father Was Very Stressed Because There Was No Food Or Money In The House; Tears Well Up In The Eyes Of The Son Of A Yaval ST Employee Who Committed Suicide | Marathi News

एसटी संप:घरात धान्य, पैसेही नसल्यामुळे वडील खूपच तणावात असायचे; आत्महत्या केलेल्या यावलच्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाला अश्रू अनावर

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘घरातील धान्य संपले होते. घरखर्चासाठी पैसेही नव्हते. त्यामुळे वडील खूपच तणावात असायचे. संपात सहभागी झाल्याने सरकारने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा अल्टिमेटम दिला होता. याच कारणांनी त्यांनी मृत्युला कवटाळले.’, हे गहिवरलेले बाेल आहेत आत्महत्या केलेले यावल येथील एसटी कर्मचारी शिवाजी पंडित पाटील यांचा मुलगा हेमंत पाटीलचे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजी पाटील यांच्या पत्नी हिरकणी, मुलगा व मुलगी रुग्णालयात पोहोचले. पतीच्या मृत्यूची बातमी कळताच हिरकणी या ग्लानी येऊन बेशुद्ध पडल्या. त्यांना रुग्णालयातच उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुमारे दोन तास त्यांची शुद्ध हरपली होती. मुलगा हेमंतचाही अश्रुंचा बांध फुटला होता. पाटील यांचे सासरे गोपाल बारी यांनीही संतप्त प्रतिक्रिया देत जावयाच्या मृत्यूस उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार हेच जबाबदार असल्याचे सांगितले. ‘जावई यांच्याकडे स्वत:चे घर नाही, शेती नाही. भाड्याच्या घरात राहून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिल्याने सर्वच जण तणावात आहेत. या मुळे पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पाटील यांच्या नातेवाइकांसह एसटी कर्मचाऱ्यांनी केली. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने गर्दीवर नियंत्रण मिळवले.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी...
‘मी शिवाजी पंडित पाटील, रा. यावल, ता. जि. जळगाव. माझी मन:स्थिती खराब असल्याने मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येचा माझ्या परिवाराशी काहीही संबंध नाही’ असे लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

कामावर होणार होते हजर
शिवाजी पाटील हे २५ मार्च रोजी जळगावात आले होते. बसस्थानकात काही सहकाऱ्यांशी त्यांनी गप्पा मारल्या. खिशात पैसे नसल्याने त्यांनी एका सहकाऱ्याकडे पैशांची मागणी केली होती. कामावर हजर होण्याचा विचार करुन त्यांनी त्याच दिवशी विभाग नियंत्रकांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, भेट न झाल्याने ते हताश होऊन पुन्हा घरी निघून गेले होते.

खिशात एक रुपयाचे नाणे
शिवाजी पाटील यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. सेवेत रुजू झाले तेव्हा त्यांचा १२ हजार रुपये मूळ पगार होता. म्हणजेच त्यांच्या हाती केवळ १७ हजार रुपये पगारापोटी यायचे. ७ नोव्हेंबर २०२० नंतरपासून पगार बंद होता. सोमवारी पोलिसांनी त्यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता खिशातून ओळखपत्र, सुसाइड नोट व एक रुपयाचे नाणे मिळाले.

राज्यातील ११५ वी तर जिल्ह्यातील तिसरी आत्महत्या
एसटी कर्मचारी संपावर गेल्यापासून आतापर्यंत राज्यात ११४ तर जिल्ह्यात तीन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कुसुंबा येथील मनोज चौधरी यांनी थेट मुख्यमंत्र्याच्या नावाने सुसाइड नोट लिहित आत्महत्या केली. त्यानंतर सावदा येथील घोडके व सोमवारी यावलच्या शिवाजी पाटलांनी हे टोकाचे पाऊन उचलले.

बातम्या आणखी आहेत...