आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृदगंध दरवळला:पहिलाच पाऊस दमदार, पाऊण तासात 9 मि.मी; शनिपेठेत सहा तास वीजपुरवठा खंडित

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन महिन्यांपासून उकाडा आणि उच्चांकी तापमानात उष्णतेचे चटके सहन करणाऱ्या जळगावकरांना रविवारी प्रथमच पहिल्याच दमदार पावसाने दिलासा मिळाला. दिवसभर ढगाळ वातावरण आणि दुपारी ३ वाजता शहरात झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पाऊण तासात नऊ मि.मी. पाऊस झाला. यंदाच्या उन्हाळ्यानंतर या पावसामुळे प्रथमच पारा ३४ अंशांपर्यंत खाली आला. दुपारी पाऊस उघडल्यानंतर घराबाहेर पडलेल्या नागरिकांसाठी पहिलाच संडे कूल ठरला.

हवामान विभागाने मे महिन्यात वर्तवलेल्या अंदाजानुसार खान्देशात ११-१२ जून रोजी मान्सूनचे आगमन होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सध्या मान्सूनचा प्रवास मुंबईपर्यंत आला असून जिल्ह्यात १२ जून रोजी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून जळगावकरांना दिलासा दिला. दुपारी ३ ते ३.४५ वाजेपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली. उपनगरांत तुरळक ठिकाणी पाऊस सुरू होता. रविवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. शहरावर बाष्पयुक्त ढग दिसत असल्याने आज पावसाचे आगमन होईल ही आस ठेवून जळगावकर बाहेर पडले होते. अखेर दुपारी पाऊस झाला.

बाजारपेठेत धावपळ
साेमवारपासून शहरातील शाळा सुरू होत असल्याने अनेक पालक मुलांसह खरेदीसाठी रविवारी बाजारपेठेत आले होते. बाजारपेठेत शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. पावसाने सर्वांचीच धांदल उडाली होती.

तापमानात झाली घट
चाळिशीपर्यंत खाली आलेले तापमान रविवारी ३४ अंशांवर आले होते. वाऱ्याचा वेग ताशी १७ किमीपर्यंत तर आर्द्रता ५२ टक्क्यापर्यंत होती. जळगाव शहरासह रविवारी जिल्हाभरात पावसाने दमदार हजेरी लावली.

या भागांत साचले पाणी
पहिल्याच पावसामुळे शहरातील गटारी तुंबल्या होत्या. पाणी रस्त्यावर आल्याने दाणाबाजार, नवीपेठ, नेहरू चौक, बी. जे. मार्केट, जिल्हा परिषद समाेर रस्त्यावर पाणी साचले. किरकोळ विक्रेत्यांचे हाल झाले.

पाऊस सुरू होताच वीज गुल
शनिपेठेत वीजपुरवठा खंडित झाला. सहा तासांनंतरही तो सुरू झालेला नव्हता. वीज कधी येईल? हे विचारण्यासाठी या भागातील नागरिक वीज वितरणच्या कार्यालयाला फोनवरून विचारणा केली; पण तेथे कुणीच फोन उचलत नव्हते. मात्र, दुरुस्तीच्या कामात कर्मचारी व्यग्र होते, असे इन्चार्ज रोहित गोवे यांच्याकडून सांगण्यात आले.

पुढील ७२ तास पावसाचे
शनिवार, रविवारचा जळगावातील पाऊस ही पूर्वमोसमी आणि मोसमी पावसादरम्याची स्थिती आहे. पुढील ७२ तासांतही पावसाची शक्यता आहे. यापूर्वी जळगावात ९ जूननंतर पावसाचा अंदाज होता. मात्र, आता झालेली सुरुवात उशीर झाला असे म्हणता येणारी नाही. कोकण, गोव्यानंतर मुंबईपर्यंत धडकलेला मान्सून खान्देशात लवकरच सक्रिय होईल.
डॉ. अनुपम कश्यपी,
वरिष्ठ हवामान तज्ज्ञ, आयएमडी, पुणे

बातम्या आणखी आहेत...