आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तरेकडील शीतप्रदेशातुन दक्षिणेकडील उबदार प्रदेशांकडे स्थलांतर करणाऱ्या पक्षांसाठी अभयारण्य सुरक्षित संचारमार्ग प्रदान करते. यात वन्यजीव संरक्षण संस्थेचे वनस्पती व पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे व प्रसाद सोनवणे यांनी केलेल्या संशोधनात ‘स्लेटी-लेग्ड क्रेक’ या रैलीडी कुळातील रहिवासी व स्थानिक स्थलांतरित पक्षाची नोंद केली आहे.
यावल अभयारण्यात स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षांच्या सुमारे 350 प्रजाती आढळतात. अभयारण्यात हिवाळी तसेच उन्हाळी स्थलांतरित पक्षांच्या अनेक प्रजाती स्थलांतर काळात अधिवास करताना दिसुन येतात. या प्रजातीची ही नोंद मध्यभारतातील पहिली छायाचित्रीत नोंद आहे. त्यांची या पक्षासंबंधीची रिसर्चनोट इंडियन बर्ड्स विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाली. या संशोधनासाठी त्यांना यावलच्या सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, अमोल चव्हाण,रवींद्र फालक, अमन गुजर, बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे, चेतन भावसार यांचे सहकार्य मिळाले.
असा आहे ‘स्लेटी-लेग्ड क्रेक’
स्लेटी-लेग्ड क्रेक (मातकट पायाची फटाकडी)
पाय हिरवट राखाडी असुन बोटे लांबसडक असतात. याची वरील बाजु गडद तपकिरी, पोटाकडील बाजुवर पांढरे व काळे पट्टे असतात. चोच हिरवी व डोळे लाल असतात. शेपटी आखुड असते. हे पक्षी घनदाट जंगलातील पाणथळ जागी आढळतात. सायंकाळी अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. स्लेटी-लेग्ड क्रेकची यावल अभयारण्यातील ही नोंद संपूर्ण मध्य-भारतातील तसेच महाराष्ट्रातील पश्चिम घाटाबाहेरील पहिलीच नोंद आहे. यामुळे या एकांतवासी, गुप्त जीवन जगणाऱ्या, सायंचर व आंशिक निशाचर पक्षाची आणखी आढळस्थाने व त्यांचा स्थलांतर मार्ग शोधण्यास मदत मिळू शकते. यावल अभयारण्यातुन नवनवीन पक्षांची नोंद होणे तेथील पक्षी विविधतेच्या संपन्नतेचे प्रतीक आहे.
दूर्मिळ पक्षांचीही नोंद
यावल अभयारण्यात दूर्मिळ घुबडे, गरुड, सुतार, तांबट, पाणपक्षी, वटवटे, भारिट, रानपरिट, टायटलरचा पर्णवटवट्या, कडा पंकोळी, ब्लु- कैप्ड रॉक थ्रश, टिकेल्सचा कस्तुर, राखी रानभिंगरी, नवरंग आदी पक्षांचा अधिवास आहे. त्यामुळे अभयारण्य अतिमहत्वाचे पक्षी अधिवास क्षेत्र घोषित होण्यास पात्र आहे. परंतु वाढते अतिक्रमण, जंगलतोड, अपुरे मनुष्यबळ यामुळे जिल्ह्यातील पक्षांचा हा सम्रुद्ध अधिवास धोक्यात येत आहे. असे मत पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.