आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या छातीच्या आत साडेचार किलो वजनाची एक गाठ घेऊन जगण्याची कल्पना तरी आपण करू शकतो का? पण सडपातळ बांध्याच्या ४५ वर्षे वयाच्या रुग्णाने अशी ‘न्यूरोएंडोक्राइन’ नावाच्या कर्करोगाची गाठ घेऊन अनेक महिने काढले. नुकतीच जळगावात त्याच्यावर शस्त्रक्रिया करून ही गाठ त्याच्या छातीतून काढण्यात आली आहे. एक कोटी लोकांमधून एखाद्याला हा आजार संभवतो.
नीलेश सोनवणे असे या रुग्णाचे नाव आहे. ते अभियंता असून गुजरातमध्ये अनेक वर्षांपासून नोकरी करतात. दीड वर्षापूर्वी त्यांना छातीत दुखणे, चालताना दम लागणे अशी लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी तपासणी करून घेतली. छातीत गळ्याच्या खाली गाठ असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी उपचार सुरू केले. रेडिओअॅक्टिव्ह थेरपी आणि किमोथेरपी करण्यात आली; पण गाठ वाढतच गेली. त्यामुळे शस्त्रक्रिया हाच पर्याय होता. चांडक कॅन्सर हाॅस्पिटलमध्ये चार तास शस्त्रक्रिया करून ही साडेचार किलो वजनाची गाठ काढण्यात आली.
दुर्मिळात दुर्मिळ आजार : डाॅ. नीलेश चांडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानेतील थायरॉइड ग्रंथीखाली म्हणजेच छातीमध्ये वरच्या भागात थायमस नावाची ग्रंथी असते. या ग्रंथीत कर्करोगाची लागण होण्याचे प्रमाण इतर कर्करोगांच्या तुलनेत अवघे एक टक्का आहे. त्यातही या ग्रंथीत ‘न्यूरोएंडोक्राइन’ नावाचा ट्यूमर होण्याचा प्रकार तर दुर्मिळात दुर्मिळ म्हणजे एक कोटी लोकांमध्ये एखाद्याला हा कर्करोग होतो. अशा शस्त्रक्रियांची उदाहरणेही विरळच आहेत.
मोठ्या आकारामुळे समस्या नीलेश सोनवणे यांच्या छातीत विकसित झालेल्या गाठीमुळे त्यांचे एक फुप्फुस पूर्णपणे दाबले गेले होते आणि दुसऱ्यावरही दबाव वाढला होता. हृदय पूर्णपणे उजवीकडे ढकलले गेले होते. नीलेश यांच्या छातीचा पिंजरा उघडूनच ही गाठ काढावी लागणार होती. त्यांची प्रकृती पाहता त्यात धोका होता. त्याची कल्पना त्यांनाही देण्यात आली हाेती. शस्त्रक्रिया सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही निर्माण झाली होती. पण डाॅ. नीलेश चांडक, त्यांचे सहकारी डाॅ. नवीन कासलीवाल, डाॅ. प्रणव माळी, डाॅ. वर्षा कुळकर्णी, डाॅ. सागर व्यास आणि डाॅ. श्रद्धा चांडक यांना रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश मिळाले.
^रुग्णाची खालावलेली आरोग्यस्थिती पाहता ही शस्त्रक्रिया एक आव्हान होती. हृदय आणि डाव्या फुप्फुसाला चिकटलेली गाठ काढताना हृदयाच्या स्नायूंना इजा झाल्याने हार्टअॅटॅकसदृश परिस्थिती झाली होती. पाच बाटल्या रक्त द्यावे लागले. पण आम्हाला या रुग्णाला रोगमुक्त करण्यात यश आले, याचे समाधान आहे. डाॅ. नीलेश चांडक, जळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.