आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य धोक्यात:रामनगरात साचलेल्या गटारीचे पाणी बाथरुममार्गे घरात शिरून पसरतात अळ्या; संसर्गजन्य आजारांना निमंत्रण

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रामनगरात साचलेल्या गटारीचे पाणी बाथरूममार्गे घरात शिरून सर्वत्र अळ्या पसरत आहेत. या अळ्यांमुळे इतर संसर्गजन्य आजारांना निमंत्रण मिळत आहे. या परिसरातील नागरिकांचे सकाळी उठल्याबरोबर पहिले काम म्हणजे घरासमोरील गटारी साफ करण्याचे असते. त्यानंतरच येथील नागरिक अंघोळीसह इतर कामांकडे वळतात.

रामेश्वर कॉलनी परिसरातील रामनगरात मोठ्याप्रमाणात गटारींची दुरवस्था झाली आहे. येथील रस्त्यांचे डांबरीकरण झाल्याने गटारी या जमिनीच्या खाली गेल्या आहेत. या परिसरात गटारींची कामेच झाली नसल्याने एखादा दुचाकी वाहक रस्त्याच्या कडेला गेले तर त्याचे वाहन सरळ गटारीत घसरते. तसेच या गटारींचा निचराच होत नसल्याने त्या पूर्णत: गाळाने भरल्या आहेत. पालिकेचे गटारी काढणारे 15 दिवसांनंतर एखाद्या दिवशी येऊन वरवर गटार काढत असल्याने पाण्याचा निचराच होत नाही. तसेच येथील घरे रस्त्याच्या खाली गेल्याने नळांच्या पाण्याच्या दिवशी गटारीचे पाणी सरळ कंपाउंड, बाथरूममध्ये जाते. या पाण्याला दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात येते. तसेच पाण्यातून येणाऱ्या अळ्या या घरातही येतात. त्यामुळे येथील गटारींची कामे करावीत, अशी मागणी येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गटारीचे पाणी सरळ बाथरूममध्ये येते

येथील अनेक घरे ही रस्त्याच्या खाली गेली आहेत. येथे रस्त्याचे काम झाले असले तरी गटारीचे काम होणे गरजेचे आहे. रामनगरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील गटारी या संपूर्णत: गाळाने भरल्या आहेत. पालिकेच्या नळांच्या पाण्याच्या दिवशी गटारीचे पाणी हे पोर्चमध्ये येते. तसेच गटारी लगत असलेल्या पाइपद्वारेदेखील पाणी बाथरुमपर्यंत येत असल्याने घरात दुर्गंधी सुटते. तसेच या पाण्यातून अळ्या देखील चालत येत घरात शिरतात. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे, असे रामनगरमधील रहिवासी बंडू सोनवणे यांनी सांगितले.

कस्तुरीपासून पाणी येते

समीर पिंजारी यांनी सांगितले की, आमचे घर गटारींच्या शेवटच्या टोकाला आहे. येथून पाणी वाहून जाण्यास जागाच नसल्याने दररोज या परिसरात पाणी तुंबून राहते. दररोज या गटारीच्या पाण्याला जाण्यासाठी वाट करून देणे हेच आमचे पहिले काम असते. त्यानंतरच आम्ही अंघोळीसह इतर कामांकडे वळतो. हॉटेल कस्तुरीपासून रामनगरात पाणी वाहून येते. या पाण्याला वाहून जाण्यास वाटच नसल्याने येथे मोठ्याप्रमाणात पाणी तुंबून राहते. तसेच रस्ता देखील अतिषय निमूळता झाल्याने रहदारीस देखील अडथळा होतो.

बातम्या आणखी आहेत...