आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेट्रीचंड:भगवान झुलेलाल यांच्या सजीव आरास, मिरवणुकीने वेधले लक्ष; महिलांनी गरबा खेळून झुलेलाल यांचा केला जयघोष

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट संचलित भगवान झुलेलाल उत्सव समितीतर्फे चेट्रीचंड अर्थात सिंधी दिवस व भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्ताने शनिवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. सिंधी महिला व तरुणींनी मिरवणुकीदरम्यान पारंपरिक फेटे व ड्रेस कोडमध्ये येत गरबा खेळून व नृत्य करून उपस्थितांचे लक्ष वेधले. मिरवणुकीच्या मार्गात ठिकठिकाणी सरबत आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले.

कोरोनानंतरच्या दोन वर्षांच्या खंडानंतर व प्रशासनाने सर्व निर्बंध उठवल्याने प्रथमच चेट्रीचंडनिमित्ताने सिंधी समाजातर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक दुपारी ५ वाजता टॉवर चौकातून काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान भगवान झुलेलाल यांचे सजवलेले रथ, फेटा व पारंपरिक वेशभूषेतील महिला-तरुणींनी रंगत आणली.

या मिरवणुकीदरम्यान सिंधी समाजातील महिला व पुरुषांनी गरबा व नृत्य केले. मार्गात अनेकांनी सजवलेल्या रथातील भगवान झुलेलाल यांचे दर्शन घेतले. तसेच अनेक भाव व भक्तिगीतांचे गायन केले. मिरवणूक गुरुद्वारा परिसरात पोहोचल्यानंतर सिंधी शहर पंचायततर्फे मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. या वेळी माजी आमदार गुरुमुखदास जगवानी, मनोहर रावलानी, विजय दारा, सतीश मतानी, ओमप्रकाश कौरानी, टिकमदास तेजवानी, कन्हैयालाल हासिजा, सुरेश गलाणी, महेश चावला, दीपू कुकरेजा, बाबूलाल वरियानी, घनश्याम हासवानी, घनश्यामदास कारडा, कन्हैयालाल कुकरेजा, राजकुमार अडवानी, अशोक मंधान व इतर सिंधी समाज बांधव उपस्थित होते.

पूज्य सेवा मंडळ येथे मिरवणुकीचा समारोप
सजवलेल्या रथातून भगवान झुलेलाल यांचे दर्शन घेत मिरवणुकीला टॉवर चौकातील (फुले मार्केट) येथून सुरुवात झाली. त्यानंतर संत गोधडीवाला मार्केट चौक, शिवाजीरोड, कोंबडी बाजारमार्गाने पंचमुखी हनुमान मंदिर, गणेशनगरमार्गे भगवान झुलेलाल मंदिर, संत कंवरराम चौक, बाबा हरदासराम हौसिंग सोसायटी मार्गाने, कंवरनगर (सिंधी कॉलनी) येथे ही मिरवणूक पोहोचून रात्री १० वाजेच्या सुमारास पूज्य सेवा मंडळ येथे या मिरवणुकीचा समारोप झाला.

बातम्या आणखी आहेत...