आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्स्पोज:‘बॉडी स्पा’च्या नावाने देहविक्रीचे आमिष; तरुणांना घातला जातोय ऑनलाइन गंडा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भजेगल्ली केली जातेय देशभर बदनाम; बदनामीच्या भीतीने सर्वांचेच तोंडावर बोट

‘बाॅडी स्पा’च्या नावाने सुंदर मुलींचे फोटो समाज माध्यमांवर पाठवयाचे आणि देहविक्रयाचे अमिष दाखवून पुरुषांची आर्थिक लुबाडणूक करायची, असा प्रकार शहरात सध्या जोमात सुरू झाला आहे. यात ५०० ते हजार रुपयांचाच गंडा घातला जात असल्याने बदनामीच्या भीतीने फारसे कोणी तक्रार करायला समोर येत नाहीत आणि त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांचे अधिकच फावते आहे. या प्रकारात शहरातील भजेगल्ली मात्र, बदनाम केली जाते आहे. दोन तरुणांनी ‘दिव्य मराठी’कडे केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार सायबर पोलिसांपर्यंत पोहोचवला.

जळगावातील ‘बाॅडी स्पा’ असे इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न केला की ‘सोनी बाॅडी स्पा’ हे ठळक नाव समोर येते. त्याचा पत्ता भजेगल्ली असा देण्यात आला आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ८९७९२३४६५५ हा भ्रमणध्वनी क्रमांक तिथे नोंदवला आहे. शहरातील दोन तरुणांना या स्पाच्या माध्यमातून सुंदर तरुणी पुरवल्या जातात, अशी माहिती मिळाल्यावर त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधला. तिकडून प्रतिसादही मिळाला. मुलींची चौकशी केल्यावर पलिकडून या तरुणांना काही तरुणींचे फोटो पाठविण्यात आले.

त्यापैकी एक फोटो निवडल्यावर त्यांना ५०० रु. पाठवायला सांगण्यात आले. संबंधित तरुणी एका कारमधून भजेगल्लीत येईल आणि तुम्हाला भेटेल. तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी किती रक्कम तिला द्यावी लागेल हेही त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार या तरुणांनी ५०० रुपये आॅनलाइन पाठवले. नंतर बराच वेळ वाट पाहूनही कोणी संपर्क न साधल्याने त्यांनी पुन्हा त्या क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा त्यांना प्रतिसाद मिळणे बंद झाले. आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी ‘दिव्य मराठी’ला हा प्रकार सांगितला.

सायबर पाेलिसांकडे तक्रार अर्ज
दरम्यान, या प्रकारात ५०० ते हजार रुपयांपर्यंतच फसवले जात असल्यामुळे कोणी अजून तक्रार दाखल केली नसली तरी अशा प्रकारे फसवले जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर येते आहे. अनेक तरूण इंटरनेटवरील या माहितीमुळे तिकडे आकर्षित होत आहेत, असे या तरुणांचे म्हणणे आहे. त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्जही दिला आहे.

ओळख करून फसवणूक
सोशल मिडीयावरून ओळख निर्माण करायची, संवाद वाढवून विश्वास संपादन करायचा आणि नंतर मोहात पाडून व्हीडीओ रेकाॅर्डींग करायची. त्या आधारे ब्लॅकमेल करायचे, असे प्रकारही वाढत चालले आहेत. गेल्या महिन्यात अशा काही तक्रारी सायबर सेलकडे आल्या आहेत.
चाैकशी करून अाॅनलाइन पैसे पाठवले की दिलेला संपर्क क्रमांक येताे बंद

उत्तराखंडमधून आॅपरेशन
दरम्यान, हा संपर्क क्रमांक सायबर पोलिसांकडे तातडीने देण्यात आला. संबंधिताचा ठाव मिळताच त्याला पकडता येईल, या उद्देशाने पोलिसांनी तो कुठून आॅपरेट होतो आहे हे तपासले असता थेट उत्तराखंडमधून तो आॅपरेट होत असल्याचे समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...