आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांडपाणी रोखले:मनपा यंत्रणेने मेहरूण तलावात जाणारे सांडपाणी रोखले नाही, चक्क लपवले

चरणसिंग पाटील | जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती विसर्जनापूर्वी मेहरूण तलावात जाणारे सांडपाणी बंद करण्यात येईल हे आश्वासन पाळण्याचा महापालिकेने केलेला ‘देखावा’ विसर्जनापूर्वीच कोसळला असून पालिकेने बेमालूमपणे केलेली लपवाछपवी उघडकीस आली आहे. ही पळवाट पालिकेच्या वरिष्ठ पातळीवरून ठरवून शोधण्यात आली की महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच वरिष्ठांच्याही डोळ्यात धुळ फेकली आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे.

शहरातील एकमेव तलाव असल्याने मेहरूणच्या तलावात गणपती विसर्जन केले जाते. मात्र, आजुबाजूच्या वसाहतींतील दुषित सांडपाणी तलावात सोडण्यात येत असल्याने तलावातील पाणी प्रदूषित होते आहे. त्यामुळे तलावातील जैवविविधता धोक्यात आली असून हे प्रदूषित पाणी रोखावे अशी मागणी सातत्याने होते आहे. त्या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडूनही ारंवार आश्वासने देण्यात आली असली तरी त्यावर कार्यवाही मात्र अजून झालेली नाही. विद्यमान आयुक्त विद्या गायकवाड यांनीही १२ आॅगस्ट रोजी तलावाची पाहणी करून हे प्रदूषित पाणी गणेश विसर्जनापूर्वी तलावात जाण्यापासून रोखण्यात येईल, असे आश्वासन दिले हाेते.

आता दूषित पाणी दिसत नाही, पण.. गणेश विसर्जनापूर्वी तलावात जाणारे घाण पाणी रोखण्याचा शब्द पाळला जात असल्याचा देखावा महापालिका यंत्रणेने केला. जे पाणी जळगाव-पाचोरा रस्त्यावरून वाहात तलावात जात होते ते आता तलावात जाताना दिसत नाही. कारण ते तलावाकडे जाण्यासाठी आता जमिनीच्या खालून मोठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यासाठी रस्त्यावर चारी खोदण्यात आली होती आणि ती तातडीने बुजवून त्यावर डांबरीकरण करण्याचा उत्साहही यंत्रणेने दाखवला आहे. त्यामुळे तलावाकडे जाणारे पाणी बंद झाले, असे चित्र दिसते.

शाेष‌खड्ड‌्यामुळे निम्मे समस्या कमी पालिकेने शिरसाेली राेडच्या लगत शाळेसमाेर माेठा शाेषखड्डा खाेदला आहे. त्यात परिसरातील सांडपाणी जमा करून ते पंपाच्या माध्यमातून उपसून दुसरीकडे वाहून नेले जाते. त्यामुळे समस्या निम्मे कमी झाली आहे. दुसरीकडे महापालिका यंत्रणेने छुप्या पद्धतीने आणखी एका ठिकाणचे पाणी तलावाकडेच वळवले आहे.

तलावाच्या खाली जमिनीत टाकी रस्त्याच्या खालून तलावाकडे जाणारे सांडपाणी तलावात पडताना मात्र दिसत नाही. मग ते जाते कुठे? याचा तपास करताना तलावाच्या काठावर जमिनीत एक प्लास्टिकची मोठी टाकी ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली. रस्त्याच्या खालून मोठ्या जलवाहिनीतून तलावाकडे जाणारे हे पाणी तलावाच्या बाजूला टाकीत पडते. ती टाकी वरून मुरूम टाकून लपवण्यात आल्याचेही सांगण्यात येते आहे. ही टाकी भरत नाही, कारण खालून ते पाणी जमिनीत आणि जमिनीतून तलावात जाईल, अशी सोय केली असण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे यंत्रणेने नेमके काय केले आहे, याची चौकशी गरजेची आहे.

बातम्या आणखी आहेत...