आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमखेडी रस्त्यावरील थरार:भररस्त्यात पोलिसासमोर केला वडिलांचा खून; आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या वडिलांना संपवले, दोघे मुले अटकेत

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मारेकरी पळून जाऊ नये म्हणून जागेवरच घातल्या बेड्या; पाेलिसांनी दिली माहिती

पोलिस कर्मचारी ड्यूटीवर जात असताना रस्त्यावर एक मुलगा हातात चाकू घेऊन प्रौढास भोसकत होता तर दुसरा काठीने मारहाण करत होता. हा थरार पाहून पोलिसाने मारहाण करणाऱ्या दोघा तरुणांना जागेवरच बेड्या घातल्या. यावेळी मुलांच्या आईने पोलिसाला विरोध केला होता. रविवारी सकाळी १०.३० वाजता निमखेडी रस्त्यावर ही घटना घडली आहे. आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन वडील सतत वाद घालत होते. या कारणावरून मुलांनी बापाचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. प्रेमसिंग अभयसिंग राठोड (वय ५०, रा. निमखेडीरोड, मूळ रा. घनश्यामपर, ता. खकनार, जि. बऱ्हाणपूर) असे मृताचे नाव आहे तर त्यांची मुले गोपाळ (वय १८) व दीपक (वय २२) यांनी हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटना अशी की, प्रेमसिंग राठोड यांच्या पत्नी बसंतीबाई व दीपक, गोपाळ, कविता, शिवाणी ही चार मुले गेल्या दोन वर्षांपासून निमखेडी रस्त्यावरील लता राजेंद्र लुंकड यांच्या घरी भाड्याने राहतात.

घरासमोरील शेडमध्ये विशाल राजेंद्र चोपडा यांच्या मालकीचे गुरे राखण्याचे काम राठोड कुटंुबीय करत होते. तसेच गोपाळ व दीपक हे दोघे मजुरीदेखील करायचे. दरम्यान, प्रेमसिंग हे नेहमी पत्नी बसंतीबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेत असत. त्यांच्या कानाची शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे रविवारी सकाळी दीपक व गोपाळ या दोन्ही मुलांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घेऊन जाणार होते. यावेळी प्रेमसिंग यांनी पत्नी बसंतीबाई हिलादेखील सोबत घेण्यास सांगितले. यावरून पुन्हा एकदा पती-पत्नीत वाद झाले. प्रेमसिंग यांनी पत्नीवर संशय घेतल्यामुळे मुलांना राग आला. प्रेमसिंग यांनी पत्नी व मोठा मुलगा दीपक यांंना मारहाण करण्यास सुरुवात केली होती. यामुळे िपता-पुत्रात झटापट सुरू झाली. प्रेमसिंग यांनी घरातून चाकू आणून गोपाळवर वार करण्याचा प्रयत्न केला.

गोपाळने चाकू हिसकावून घेतल्याने त्यांनी मोठ्या काठीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. वाद वाढल्याने गोपाळने थेट वडिलांच्या पोट, छाती व पायावर चाकूने सपासप वार केले तर दीपकने काठीने मारहाण केली. यात रक्तबंबाळ झालेले प्रेमसिंग अंगणातून थेट रस्त्यावर पळत आले. त्यांच्या मागे मोठा मुलगा दीपक व गोपाळ दोघे आले. गोपाळने रस्त्यावरही वार केले. यात ते जमिनीवर कोसळून जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. भररस्त्यावर ही घटना घडत असताना तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी श्याम बोरसे हे दुचाकीने याच रस्त्याने ड्यूटीवर जात होते. रस्त्यात कोणाचे तरी भांडण सुरू आहे. एक महिला, मुलगी रडत पळत असल्याचे त्यांनी पाहिले. दुचाकीचा वेग वाढवून बोरसे यांनी थेट घटनास्थळ गाठले. यावेळी प्रेमसिंग रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर गोपाळ हातात चाकू घेऊन तेथेच उभा होता.

मोठा मुलगा दीपक हातात काठी घेऊन घटनास्थळावरच होता. गोपाळ याने चाकूने वार केल्याचे बोरसे यांना दुचाकीवरूनच दिसले होते. त्यामुळे बोरसे यांनी तत्काळ दीपक व गोपाळ या दोघांना पकडून ठेवत पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या हातात बेड्या घातल्या. पोलिस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. काही मिनिटातच पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पथक घटनास्थळी आले. त्यांनी गोपाळ व दीपक या दोघांना ताब्यात घेतले तर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी मृत प्रेमसिंग यांचे भाऊ रोहिदास अभयसिंग राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गोपाळ व दीपक विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कुंभार तपास करीत आहेत.

पोलिस ठाण्यात झाला घटनेचा उलगडा
घटनास्थळावरून दीपक व गोपाळ या दोन्ही भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. भररस्त्यावर खून झाल्याची ही गंभीर घटना असल्यामुळे अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन दीपक व गोपाळ या दोघांकडून माहिती घेतली. घटनाक्रम स्पष्ट झाल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली..

मारेकरी पळून जाऊ नये म्हणून जागेवरच घातल्या बेड्या; पाेलिसांनी दिली माहिती
निमखेडी रस्त्यावर दोन जणांमध्ये झटापट, मारहाण सुरू असल्याचे सुमारे ७० ते ८० मीटर लांब अंतरावरून मला दिसले होते. त्यामुळे दुचाकीचा वेग वाढवून घटनास्थळी पोहोचलो. यावेळी एका मुलाच्या हातात रक्ताने माखलेला धारदार चाकू होता. दुसरा एक मुलगादेखील हातात काठी घेऊन तेथे उभा होता. तर एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडला होती. या मुलानेच संबंधित व्यक्तीवर वार केल्याचे मला दिसले होते. मारेकरी व मृत कोण होते याची माहिती नव्हती; परंतु, मारेकरी पळून जाऊ नये म्हणून दोन्ही मुलांना घटनास्थळी जागेवरच पकडून ठेवत त्यांच्या हातात बेड्या घातल्या. यानंतर पोलिस ठाण्यात फोन करून मदत मागितली, अशी माहिती पोलिस कर्मचारी श्याम बोरसे यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना दिली.

बातम्या आणखी आहेत...