आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:बस न्यूट्रल करताना ब्रेक दाबला असता तर वाचली असती वृद्धा ;बसस्थानकामध्ये बसच्या धडकेने जागीच मृत्यू

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बसस्थानकात शेकडो प्रवाशांची वर्दळ असते. या गर्दीत सुरक्षित बस हाताळण्याचे धडे चालकांना दिले जातात. असे असतानाही शनिवारी दुपारी चार वाजता नवीन बसस्थानकात चालकाने फलाटावर उभ्या असलेल्या बसच्या अॅक्सिलेटरवरून पाय काढून ती न्यूट्रल केली; परंतु ब्रेक न दाबल्याने उतारावर असलेली बस काही अंतर पुढे जाऊन ती वृद्धेला धडकली. यात पुढच्या चाकाखाली आल्याने वृद्धा जागीच ठार झाली. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीबाई नामदेव जोशी (वय ६८, रा. जोशीपेठ) असे मृत वृद्धेचे नाव आहे. लक्ष्मीबाई यांच्या मुलीच्या मावस सासऱ्यांचे शनिवारी चोपडा येथे निधन झाले. त्यामुळे लक्ष्मीबाई दीर ज्ञानेश्वर विधाते यांच्यासोबत सकाळी चोपड्याला गेल्या होत्या. अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुपारी अडीचला त्या परत येण्यासाठी निघाल्या. यावेळी त्यांचे दीर शिव कॉलनी स्टॉपवर उतरले तर लक्ष्मीबाई यांना जोशीपेठेत जायचे असल्यामुळे त्या नवीन बसस्थानकात उतरल्या. बसस्थानकातून बाहेर पडत असताना धुळे आगाराचा बसचालक पांडुरंग वाणी (रा. धुळे) हा फलाटावर उभी असलेली बस (क्रमांक एमएच-२०, बीएल-४०४६) अॅक्सिलेटरवरून पाय काढून ती न्यूट्रल करत होता. यावेळी त्याने ब्रेक न दाबल्याने उतारावर असलेली बस काही अंतर पुढे जाऊन ती लक्ष्मीबाई यांना धडकली. यात त्यांचा बसच्या पुढच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. बराच वेळ त्यांची ओळख पटली नाही. अखेर स्थानकाबाहेर फळ विक्रेत्या महिलेने लक्ष्मीबाई यांना आळखले. त्यांच्या नातेवाइकांना फोन करून माहिती दिली. यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. मृत लक्ष्मीबाई यांच्या पश्चात पती, मुलगा, सून व तीन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाने पोलिस, एसटी अधिकाऱ्यांना दिली माहिती... बस धुळ्याहून जळगावात आल्यानंतर मी ती फलाटावर उभी केली. अॅक्सिलेटरवरून पाय काढून बस न्यूट्रल करताच उतारामुळे काही अंतर बस पुढे गेली. याचवेळी वृद्ध महिला बसजवळ असल्याने त्या पुढच्या चाकाखाली दाबल्या गेल्या, अशी माहिती चालक वाणी यांनी पोलिस व एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...