आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आखाडा:पोलिसांनी उधळली सभा, पदाधिकारी ताब्यात घेताच शिवसैनिकांच्या घोषणा

मुक्ताईनगर/जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाप्रबोधन यात्रा आणि महाआरतीनिमित्त ठाकरे व शिंदे गट समोरासमोर आल्यास मुक्ताईनगरात होऊ पाहणारा राजकीय राडा पोलिसांनी दोघांना परवानगी नाकारल्याने टळला. मात्र, काही झाले तरी सभा घेणारच या इरेला पेटून शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी गोदावरी मंगल कार्यालयात सभेची तयारी सुरू केली. ही माहिती मिळताच पोलिसांनी ९ पदाधिकाऱ्यांना कलम ६८ नुसार ताब्यात घेतले. त्यास शिवसैनिकांनी विरोध केला. जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता. काही वेळाने कलम ६९ प्रमाणे त्यांची सुटका झाली.

मुक्ताईनगरात शुक्रवारी सायंकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जेडीसीसी बँकेजवळ महाप्रबोधन यात्रेनिमित्त उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा आयोजित केली होती. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाने देखील बाजूलाच प्रवर्तन चौकात महाआरतीचे नियोजन केले होते. या मुद्द्यावर राजकारण तापले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत दोघांना कार्यक्रमांची परवानगी नाकारली. ठाकरे गटाने सभेसाठी तयार केलेले व्यासपीठ, बैठक व्यवस्था व अन्य साहित्य सकाळी ११ वाजताच काढून घेण्यात आले. या वेळी शिवसैनिक आणि पोलिस प्रशासनात शाब्दिक खटके उडाले. शिवसैनिकांनी सभा घेऊच अशी भूमिका घेत गोदावरी मंगल कार्यालयात तयारी सुरू केली. मात्र, पोलिसांनी त्यास परवानगी नाकारून पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यामुळे तणावात भर पडली. पण, थोड्या वेळाने पदाधिकाऱ्यांची सुटका झाली. दरम्यान, या नाट्यामुळे शहरात सकाळपासून तणाव होता. बंदोबस्त वाढवल्याने कार्यक्रम स्थळाला छावणीचे स्वरुप आले होते.

कलम ६८नुसार घेतले ताब्यात तर ६९नुसार सुटका मुक्ताईनगरात सभेला परवानगी नाकारल्याची माहिती मिळताच पक्षाचे संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, जिल्हाप्रमुख मनोहर पाटील, दीपकसिंग राजपूत, समाधान महाजन आदींनी मुक्ताईनगर गाठले. ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर खैरनार, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, समीरसिंग राजपूत यांच्यासोबत चर्चा करून गोदावरी मंगल कार्यालयात सभेची तयारी सुरू केली. ही माहिती मिळताच पोलिसांनी सायंकाळी ५ वाजता मालपुरे, पारकर व अन्य अशा ९ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. काही वेळाने त्यांची सुटका झाली.

ही तर दडपशाही उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारणे ही सत्ताधारी व पोलिसांची दडपशाही आहे. ही दादागिरी लोकशाहीला घातक असल्याचा आरोप शिवसेनेचे विलास पारकर, मनोहर खैरनार यांनी केला.

असा होता बंदोबस्त
मुक्ताईनगरचा राजकीय आखाडा तापल्याने अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे दिवसभर शहरात थांबून होते. आरसीपी प्लाॅटून, स्ट्रॅकिंग फाेर्स असे सुमारे १२५ पोलिस तैनात केले. एलसीबीचे निरीक्षक किसन नजन पाटील, डीएसबीचे निरीक्षक बाबासाहेब ठाेंबे, मुक्ताईनगरचे प्रभारी निरीक्षक राजेंद्र गुंजाळ बंदाेबस्तावर हाेते.

बातम्या आणखी आहेत...