आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन:पोलिसांकडे टाइम मशीन; ट्रक मालकाला वाचवण्यासाठी यंत्रणेने घड्याळाचे काटेही फिरवले उलटे

गणेश सुरसे | जळगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात अपघात घडतो साधारण पावणेचार वाजेच्या सुमारास, ‘दिव्य मराठी’च्या छायाचित्रकाराकडून फोटो काढले जातात ४:०१ ते ४:०५ या वेळेत. तशी नोंदही कॅमेऱ्यात होते. अपघातात मृत झालेल्या तरुणीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आल्याची नोंद होते ४:५५ वाजता; पण पोलिस दप्तरी अपघात घडल्याची वेळ नोंदवली जाते ५:०० वाजेची.

कारण दरम्यानच्या काळात अपघात करणाऱ्या ट्रकचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढण्यात येते. त्यावर नोंद येते ४:५३ वाजेची. सॉफ्टवेअरमध्ये ती वेळ बदलवता येत नाही म्हणून पोलिस टाइम मशीनप्रमाणे घड्याळाचे काटे उलटे फिरवून अपघाताची वेळच बदलून टाकतात. हा प्रकार घडला आहे रामानंद पोलिस ठाण्याच्या बाबतीत. १५ नोव्हेंबरला शिव कॉलनीजवळ हा अपघात घडला होता.

डंपरने कट मारल्याने हा अपघात झाला हाेता. त्यात दुचाकीस्वार मनस्वी सोनवणे या तरुणीचा मृत्यू झाला. संबंधित डंपर हे कासट ब्रिक्स, पाळधी या कंपनीच्या नावाने आरटीओ कार्यालयात रजिस्टर्ड आहे. बीबीएच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत असलेल्या मनस्वीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. १५ रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाने रस्त्याच्या कडेला डंपर उभे करून पळ काढला.

अपघातानंतर डंपर (क्र. एमएच-१९, सीवाय-३३११) काही वेळ घटनास्थळी उभे होते. पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी डंपर जप्त करून पोलिस ठाण्यात नेले. म्हणजेच अपघातानंतर डंपर मालक किंवा चालक यांच्या ताब्यात नव्हते. तर ४ वाजून ५३ मिनिटांनी या डंपरचे पीयूसी काढण्यात आले असून, हे पीयूसी १४ नाव्हेंबर २०२३ पर्यंत व्हॅलीड आहे. डंपर पोलिसांच्या ताब्यात होते तर पीयूसी कसे काढले गेले? असा प्रश्न उपस्थित हाेताे.

अपघातस्थळी व्हॅन बाेलावून पीयूसी काढले असावे
रत्यावरून चालणाऱ्या प्रत्येक वाहनाचे आरसी बुक, परमीट, फिटनेस, पीयूसी व विमा पॉलिसी असणे अत्यावश्यक आहे. आता पीयूसी काढून देणाऱ्या व्हॅन आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणात अपघातस्थळी व्हॅन बोलावूनही ‘पीयूसी’ काढले असू शकते.

अपघातात मृत व्यक्तीच्या कुटंुबीयांनी न्यायालयात भरपाई दावा (डेथ क्लेम कम्पन्सेशन) केल्यास धडक देणाऱ्या वाहनचालक, मालकांकडून भरपाई वसूल केली जाते. त्यांनी वाहनाचा अपघात विमा काढला असेल तर कागदपत्र क्लिअर असावे लागतात. त्यात त्रुटी चालत नाहीत.

कागदपत्र पूर्ण नसल्यास संबंधित विमा कंपनी भरपाई देत नाही. अशावेळी वाहनचालक, मालकांची चूक असल्याचे ग्राह्य धरून न्यायालय त्यांच्याकडून भरपाई वसूल करते. याच कारणाने वाहनमालकाने पीयूसी काढून घेतला असावा.

पीयूसी युनिट, आरटीओ चर्चेत
घटनेमुळे ज्या युनिटने संबंधित डंपरचे पीयूसी काढून दिले असेल त्याची चौकशी करून समोर आणले जाईल. तसेच यात आरटीओ विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही काही सहभाग आाहे का? याचीही चौकशी करणे आवश्यक आहे. हे दोन्ही विभाग संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

बातम्या आणखी आहेत...