आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण महागले:शालेय साहित्याच्या किमतीत यंदा 25 ते 30 टक्के वाढ, पालकांच्या खिशाला भुर्दंड

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून सुरवात होणार असल्याने शैक्षणिक साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर यंदा साहित्य खरेदी केले जाणार असल्याने बाजारात गर्दी आहे. दरम्यान यंदा शैक्षणिक साहित्याच्या किमतीत 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे.

गेल्या वर्षी दीडशे रुपये डझन असणाऱ्या वह्या आता 200 रुपयांवर गेल्या आहेत. तसेच 5 रुपयांना मिळणारा साधा पेन आता 7 रुपयांना मिळत आहे तर दोनशे रुपयांचे दप्तर देखील 260 रुपयांना झाले आहे. शुक्रवारी बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून आली.

यंदा पहिल्या दिवसापासून नियमित पूर्णवेळ शाळा सुरू होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. यंदा साहित्याच्या किमतीत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. वह्यांच्या किमती डझनमागे 60 ते 100 रुपयांनी वाढल्या आहे. नामांकित कंपन्यांच्या वह्यांच्या दरात 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी दीडशे रुपये डझन असणाऱ्या सर्वसाधारण प्रकारातील वह्या आता 200 रुपये डझनावर गेल्या आहे. दरम्यान सन 2019 मध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य एक हजार रुपयापर्यंत मिळत होते. यंदा त्यासाठी दीड हजार रुपये मोजावे लागतील. इंधन दरवाढ, मजुरी वाढल्याने साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे पालकांना यंदा साहित्य खरेदी करताना महागाईची झळ सोसावी लागत आहे.

शाळांच्या फी मध्येही वाढ

शाळा दोन वर्षे बंद होत्या. पण काही शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवत शुल्क वसूल केले. शासन आदेशामुळे मागील वर्षी शिक्षण शुल्कात 10 ते 15 टक्के सवलत देण्यात आली. यंदा शिक्षण शुल्कात 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे.

असे आहेत साहित्याचे दर

पेन - 12 ते 15 रुपये

वॉटर बॅग - 70 ते 330 रुपये

कंपास पेटी - 75 ते 200 रुपये

टिफिन बॉक्स - 50 ते 250 रुपये

रेनकोट - 200 ते 550 रुपये

स्कूल बॅग - 250 रुपयांपासून पुढे

वह्या - 150 ते 300 रुपये डझन

पेपर रिम - 220 रुपये

कागद, शाईसह वाहतूक महागल्याने दरवाढ

जगभरात कागद, शाई, स्टीलचे दर वाढले आहेत. याचा परिणाम शालेय साहित्यावर पडला असून वह्या, नवनीतसह इतर कंपन्यांचे प्रिंटेड स्टेशनरी यांचे दर २५ ते ३० टक्क्यांनी महागले आहे. कोरोनामुळे दोन वर्षे दप्तर, पाटी, पुस्तक, गणवेश व अन्य साहित्याची विक्री झाली नाही. वाहतूक खर्च, पेपरच्या वाढलेल्या किमतीमुळे शैक्षणिक साहित्य महागले आहे, असे विक्रेता सारंग पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...