आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचा महापाैरांच्या दालनात ठिय्या:कचऱ्यातून निघणाऱ्या विषारी धुराचा त्रास जीवावर उठला

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका आणि मक्तेदार यांच्या वादात घनकचरा प्रकल्पाचे काम रखडले आहे. त्यामुळे कचऱ्याला आग लागून निघणाऱ्या धुराचा त्रास आता जीवावर उठला आहे. दरराेजचे मरण टाळण्यासाठी निमखेडी शिवारातील नागरिकांनी महापाैरांकडे धाव घेत ठिय्या मांडला. काही नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत त्रासातून मुक्तीची मागणी केली.

मनपाचा आव्हाने शिवारात प्रस्तावित घनकचरा प्रकल्प तीन वर्षापासून सुरू हाेऊ शकलेला नाही. दरराेज ३०० मेट्रिक टन कचरा वाढत आहे. लाखाे टन कचऱ्यावर आजपर्यंत प्रक्रिया हाेऊ शकलेली नाही. त्यामुळे कचऱ्यात वायू तयार हाेऊन त्यामुळे आग लागते. आगीतून निर्माण हाेणाऱ्या विषारी वायू निमखेडी शिवारातील चंदूअण्णानगर, पवार पार्क, खाेटेनगर, भाेकणी व आव्हाने गावाकडे वाहत जाताे. त्यामुळे वर्षानुवर्षे हाेत असलेल्या त्रासातून मुक्तीसाठी या भागातील रहिवाशांनी महापाैर जयश्री महाजन यांच्याकडे धाव घेतली.

पालिका प्रशासन केवळ घाेषणा करते; परंतु प्रकल्प सुरू करत नाही. जाेपर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया हाेत नाही ताेपर्यंत धुरापासून मुक्ती नाही अशी व्यथा महिला व पुरुषांनी मांडली. प्रशासन आणि लाेकप्रतिनिधी काहीही करणार नसतील तर रहिवाशांना नाइलाजाने घरे विकून स्थलांतरित व्हावे लागेल. काही नागरिकांनी घरे विक्रीला देखील काढल्याचे त्रस्त नागरिकांनी सांगितले. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महानगराध्यक्ष नीलेश बाविस्कर, संघटक याेगेश पाटील, कार्यकारी अध्यक्ष गाेपाल महाले व नागरिकांनी मनपासमाेर उपाेषण व रास्ता राेकाे करण्याचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...