आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:महाबळ ते गाडगेबाबा चौकापर्यंतचा रस्ता खड्डेमय; वाहनधारक वैतागले

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील इतर रस्त्यांच्या तुलनेत महाबळ ते गाडगेबाबा चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या भागात इतर रस्ते तयार होत असून,हा मुख्य रस्ता खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते आहे.काही दिवसांपूर्वीच परिसरातील पठाण बाबा दर्गा ते मोहाडीरोड हा मुख्य रस्ता तयार करण्यात आला.

या कारणामुळे वाघनगरात राहणाऱ्या शेकडो लोकांनी समाधान व्यक्त केले आहे; परंतु गाडगेबाबा चौकातून महाबळकडे जाणाऱ्या सुमारे एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. या मार्गावर प्रचंड धूळ उडत असते. रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांमध्येही धूळ शिरते. या मार्गावर एक शाळा, खासगी क्लास असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ अधिक आहे. सायकलीवरून प्रवास करणारे विद्यार्थी दगड, खड्ड्यातून स्लीप होऊन पडण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.

अशातच गिरणा नदीपात्रातून चोरी केलेली वाळूची वाहनेदेखील वाघनगरातून याच मार्गाने शहरात शिरत असतात. या अवजड वाहनांमुळे आहे तो रस्तादेखील उखडतो आहे. महाबळजवळ उतारावर रस्ता खराब असल्याने वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. या भागात इतर रस्ते तयार होत असल्यामुळे हा मुख्य रस्ता लवकर तयार करावा अशी मागणी हाेत आहे.

रायसोनीनगरातून रात्रभर वाळूच्या वाहनांची वाहतूक
गाडगेबाबा चौकातून पुढे काही अंतरावर असलेल्या रायसोनीनगरातून देखील मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक होत असते. वाळूचोरी केलेली अवजड वाहने रात्रभर या मार्गावरून जात असतात. त्यामुळे कॉलनी अंतर्गत रस्ते खराब होत आहेत. पोलिस, महसूल प्रशासनाने ही वाळूचोरी रोखावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महाबळ ते गाडगेबाबा चौकापर्यंतच्या रस्त्याची अशा बिकट अवस्थेतून वाहनधारकांना ये-जा करावी लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...