आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे संधीची मर्यादा काढून आनंदवार्ता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी यूपीएससीप्रमाणे एमपीएससीमध्येही आणखी सकारात्मक बदल व्हावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना संधीची मर्यादा घातलेली होती. यासाठी आयोगातर्फे २०२० मध्ये निर्णय जाहीर झाला होता. या संधींबाबत सुधारित निर्णय ऑक्टोबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात आला होता.
त्यानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एकूण ६ वेळा परीक्षा देण्याची संधी, ओबीसी संवर्गातील उमेदवारांना ९ वेळा संधी तर अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना संधीची मर्यादा नव्हती. वर्षानुवर्षे अभ्यास करून जर अगदी यशाच्या जवळ पोहोचल्यानंतर संधी नाकारली जात असल्याने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अतिशय नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या निर्णयामुळे फेब्रुवारी महिन्यात झालेली परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास झालेला असूनही तर काही विद्यार्थ्यांनी संधी वाया जाऊ नये म्हणून परीक्षा दिल्या नाही. अशा वातावरणात आयोगाने संधींच्या मर्यादेचा निर्णय रद्द करणे ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रासाठी मोठी आनंदवार्ता ठरली आहे.
या गोष्टींमध्येही बदल हवा
यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीने संधीच्या मर्यादेच्या निर्णयासोबतच आणखी बदल करणे आवश्यक आहे. यूपीएससीचे वेळापत्रक बदलत नाही; परंतु एमपीएससीच्या वेळापत्रकात मोठे बदल होतात. मागील वर्षी ऐन परीक्षेच्या एक दिवस आधी आयोगाने परीक्षा रद्द केली होती. तसेच यूपीएससीच्या निघणाऱ्या जागा दरवर्षी सर्व विभागासाठी योग्य त्या प्रमाणात जाहीर केल्या जातात; मात्र एमपीएससीच्या जागांची निश्चितता नसते. त्यामुळे फक्त नियमांच्या आधारावर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अनुकरण न करता इतर सुविधा सुद्धा त्याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने द्याव्यात.
निर्णयामुळे ध्येय पूर्ण होईल
एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना परीक्षार्थीना वेगवेगळ्या तणावात अभ्यास करावा लागतो. त्यातच परीक्षेच्या संधी मर्यादित केल्यामुळे हा तणाव वाढला होता. ताे अाता कमी झाला. या निर्णयामुळे अाता ध्येय पूर्ण होईल.
- अविनाश निवाने, उमेदवार
तरुणांना मिळणार संधी
संधी रद्दच्या निर्णयामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे; परंतु दोन वर्षे हा निर्णय लागू असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले. या निर्णयामुळे अधिकाधिक तरुणांना संधीचा फायदा घेता येणार आहे.
- जयदीप पाटील, शिक्षक
दीड लाख विद्यार्थी घटले : आयोगाच्या संधी मर्यादा निर्णयामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीय घटलेली दिसून आली. २०१९ मध्ये सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा दिली होती; मात्र २०२० मध्ये हा निर्णय आल्यानंतर परीक्षा देणाऱ्यांची संख्या जवळपास दोन लाख ४० हजार होती. या वर्षांमध्ये उपलब्ध जागा सुद्धा मोठ्या फरकाने बदललेल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.