आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:स्थिती घाबरण्याची नाही; पण काळजी घेण्याची प्रशासन म्हणते अजून मास्कची सक्ती नाही

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. जळगाव जिल्ह्यातही गुरुवारी दोन बाधित आढळून आले. यापैकी एक बाधित हा जळगाव शहरातील असून त्याला ट्रॅव्हल्स‌् हिस्ट्री नाही. त्यामुळे संसर्ग कुठे आणि केव्हा झाला याचा काहीही थांगपत्ता नाही.

अशा परिस्थितीत संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असते आणि म्हणून काळजीही अधिक करावी लागते, असे वैद्यकिय तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे संसर्ग वाढू नये म्हणून अधिक काळजी घ्यावी लागणार. त्यातच मुंबई पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. या ठिकाणाहून दररोज हजारो नागरिक रेल्वेने जळगाव जिल्ह्यात येतात, हा धोकाही लक्षात घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात गुरुवारी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यापैकी एक रुग्ण जळगाव शहरातील गणपती नगरातील आहे तर दुसरा चोपडा तालुक्यातील आहे. गेल्या आठवड्यातील एक रुग्ण ही अजून सक्रिय आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बाधित रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून, संपर्कातील नागरिकांनी मात्र तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. रुग्णांचा संसर्ग इतिहास अज्ञात असल्याने आणि जळगाव, भुसावळ हे रेल्वेचे जन्क्शन असल्याने नागरिकांनी मास्क वापरावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ताप येताच टेस्ट करा
सध्या ट्रॅव्हल्स हिस्ट्री नसताना व गंभीर लक्षणे नसताना रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी ताप आला किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले असता तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तर वसतिगृहात राहायला येण्याआधी विद्यार्थ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

लग्नसराई, रेल्वे प्रवास धोक्याचा
लग्नसराई, यात्रोत्सव, सार्वजनिक कार्यक्रमांना सध्या प्रचंड गर्दी होते आहे. सध्या जे कोरोनाबाधित समोर येताहेत ते लक्षणे नसलेले आहेत. अर्थात, त्यांचा गर्दीतला वावर हा अधिक धोक्याचा ठरू शकतो. मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पाहतो आहे. मात्र, येथून येणाऱ्या रेल्वेगाड्यांना सध्या गर्दी आहे. त्यामुळे मास्करचा वापर स्वयंस्फूर्तीने केला तर कोरोना रोखता येईल, असे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सांगतात.

चाचण्या वाढवण्याच्या सूचना
जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. ऑक्सिजन, हॉस्पिटलायजेशन या अनुषंगाने प्रशासन तयारीत आहे. ‘हर घर दस्तक’मोहिमेंतर्गत घरोघरी जावून आरोग्य कर्मचारी माहिती घेत आहेत. मास्क वापरण्याबाबत सक्ती नसली तरी नागरिकांनी मास्कचा वापर करावा.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी

बातम्या आणखी आहेत...