आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या आठ दिवसांपासून असलेला राज्यभरातील हजारो परिचारिकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिकांनी 23 मे पासून कामबंद आंदोलन पुकारले होते. परिचारिकांच्या मागण्यांबाबत नुकतीच वैद्यकीय शिक्षण मंडळासोबत बैठक घेण्यात आली असून यात राज्यभरात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पाळणाघर उपलब्ध करण्याची सूचना देण्यात आली आहे. तर राज्यातील सर्वाधिक परिचारिकांच्या जागा रिक्त असलेल्या 10 महाविद्यांमध्ये इच्छुकांना पदस्थापना देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यानंतर बुधवारी परिचारिकांनी संप मागे घेतला.
एक तास कामबंद
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालयात 28 मे पासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. तत्पूर्वी 23 ते 25 मे तीन दिवस दररोज एक तास कामबंद आंदोलन व निदर्शने करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मागण्यांची कोणतीही दखल न घेण्यात आल्याने कामबंद आंदोलन सुरूच होते. जीएमसी जळगाव यांनी आंदोलनाला काम सुरू ठेवत पाठिंबा दिला असला तरी राज्यातील इतर महाविद्यालयांमध्ये आंदोलन सुरू ठेवण्यात आल्याने रुग्णसेवेवर परिणाम झाला होता.
बैठकीत निघाला तोडगा
अखेर मंगळवारी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी काही मागण्या मान्य करण्यात आल्या तर काही मागण्यांबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. बैठकीचे इतिवृत्त बुधवारी सादर झाल्यानंतर राज्यभरातील परिचारिकांनी संप मागे घेतला.
इच्छुकांना जळगाव, नंदुरबार पाठवणार
परिचारिका संवर्गातील सर्वस्तरातील पदोन्नती, पदनिर्मिती व पदभरती बाह्यस्राेतांद्वारे न करता कायमस्वरूपी करावी या मागणीचा विचार करता नवीन महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये पदभरती होईपर्यंत संघटनेने सुचविल्यानुसार जळगाव, नंदुरबार, अलिबाग, सिंधुदुर्ग, सातारा, अकोला, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर व गोंदिया या ठिकाणी प्रास्तापित तसेच नवीन महाविद्यालय व रुग्णालयांमधील पदांवर जाण्यास इच्छुक असलेल्या परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांनी नावे वैद्यकीय शिक्षण कार्यालयास करावी. यांनतर पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. तर राज्यभरात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये पाळणाघर तयार करण्याच्या तात्काळ सूचना देण्यात आल्या.
याबाबत सकारात्मक चर्चा
परिसेविकांची रिक्त पदे, नर्सिंग भत्ता, गणवेश भत्ता, शैक्षणिक भत्ते देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी विचार करून निर्णय देण्यात येतील, असे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.