आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ वेल्हाळे येथील राख बंडाची निविदा कायस्वरुपी रद्द करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि.६) वेल्हाळे ग्रामस्थ, लोकसंघर्ष मोर्चाने दीपनगर येथील औष्णिक वीज केंद्रावर धडक मोर्चा काढला. त्यात सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले. महा निर्मितीच्या या निविदेमुळे वेल्हाळेसह २० गावांतील दोन हजार ग्रामस्थांचा रोजगार हिरावला जाईल असा आरोप आंदोलकांनी केला. मोर्चाला लोक संघर्ष मोर्चाचे चंद्रकांत चौधरी, माजी सभापती राजेंद्र चौधरी, समाधान चौधरी, राष्ट्रवादीचे दीपक मराठे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश सरदार यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वेल्हाळे येथील राखेच्या बंडामुळे किमान दोन हजार ग्रामस्थांना रोजगार मिळाला आहे. महानिर्मितीने या राखेची निविदा काढल्याने स्थानिकांमध्ये महा निर्मिती व अधिकाऱ्यांबाबत रोष निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या. ते भूमीहीन झाले. आता राखेपासून निर्माण होणारा रोजगारही हिरावला जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. हेमंत पाटील, सतीश पाटील, विजय पाटील, मिलिंद सुरवाडे, नागो पाटील, गोलू राणे, बाळू ढाके, पुरुषोत्तम पाटील, डेबा पाटील, राजू सुरवाडे उपस्थित होते.
निविदा रद्द करण्याच्या निर्णय घेईपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली. यानंतर दीपनगरचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. आपले म्हणणे व निवेदन वरिष्ठांपर्यंत पाठवू. त्यातून सकारात्मक मार्ग निघेल, असे सांगितले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.