आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तीव्र उन्हाळ्यात रमजानचे सलग तिसरे वर्ष; ‘तरावीह’च्या विशेष नमाज पठणास शनिवारपासून झाली सुरुवात

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान पर्वाला रविवारपासून (दि.३) सुरुवात होत आहे. एप्रिल महिन्यात रमजान पर्व येण्याचे हे सलग तिसरे वर्षे आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांची तयारी पूर्ण झाली आहे. त्यात शहरातील विविध मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी रविवारपासून गर्दी होणार आहे.

रमजान महिना सबुरी आणि गोरगरिबांना मदत व सहकार्य करण्याचा महिना आहे. रोजा करताना तहान व भूक सहन करून संयम ठेवणे हे पुण्याचे काम असून, याच्या मोबदल्यात स्वर्गप्राप्ती होत असल्याचे हदिसात म्हटले आहे. शिवाय या महिन्यात रोजा सोडण्यापूर्वीची दुआ हमखास कबूल होते, अशी श्रद्धा आहे. या महिन्यातील रोजे अनिवार्य असल्याने मुस्लिम बांधव संपूर्ण महिन्याचे रोजे करतात. या उपवासांना रविवारपासून (दि.३) सुरुवात होत आहे.

इस्लाम धर्मातील पाच मूलतत्त्वांपैकी रोजा हा एक महत्त्वाचे मूल तत्त्व आहे. दरम्यान, पवित्र रमजान महिना उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात येण्याचे यंदाचे तिसरे वर्षे आहे. या अगोदर सन २०२०मध्ये २५ एप्रिलपासून पवित्र रमजानला सुरुवात झाली होती. नंतर २०२१ म्हणजेच मागील वर्षी १४ एप्रिलपासून रमजान पर्व सुरू झाले होते. यंदा ३ एप्रिलपासून रमजान सुरू होत आहे. दरम्यान, आता बाजारेपेठेतही खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.

रमजान पर्व आजपासून
पवित्र रमजानला रविवारपासून सुरुवात होत आहे. शहरात रोहते हिलाल कमिटीची सभा मौलाना उस्मान कासमी यांच्या अध्यक्षतेखाली जामा मशीद, रथ चौकात झाली. रविवारी पहिला रोजा असेल. तर तरावीहच्या विशेष नमाज पठणास शनिवारपासून सुरुवात झाली. समाजबांधवांनी रमजान पर्व शांततेने साजरे करावे, असे आवाहन अध्यक्ष वहाब मलिक, सचिव फारूक शेख, सहसचिव अनिस शाह, खजिनदार अशफाक बागवान यांच्याकडून करण्यात आले.

दहा दिवस असणार ‘रेहमत पर्व’
पवित्र रमजान महिना हा तीन पर्वांमध्ये विभागला जातो. त्यातील प्रत्येक पर्व हे दहा दिवसांचे असते. पहिले पर्व रहेमत, दुसरे मगफिरत म्हणजे स्वतःच्या हातून कळत-नकळत ज्या चुका झाल्या असतील त्या चुकांपासून क्षमा मागून सुटका करून घेणे, तिसरे पर्व दोजख-से-नजात म्हणजे नरकापासून सुटका हे होय. या पवित्र रमजानच्या महिन्यात परमेश्वराच्या कृपेचा अहोरात्र वर्षाव होत असतो. त्या रहेमतचा इस्लामधर्मीय भाविक लाभ घेतात.

बातम्या आणखी आहेत...