आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात घरी बसून केलेला अभ्यास, घरातूनच अॉनलाइन पद्धतीने दिलेल्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा टक्का घसरला आहे. परिणामी नापास होण्याच्या प्रमाणात तब्बल १० टक्क्यांची वाढ झाली आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष, कॉपी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. यंदा पहिल्यांदाच झालेल्या ऑफलाइन परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ‘दिव्य मराठी’ने एक्सपर्टशी चर्चा केल्या या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
कोरोनाच्या काळात सर्वच शाळा, महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देत होते. परीक्षा देखील ऑनलाइनच झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांवर फारसा ताण पडला नव्हता. अभियांत्रिकीच्या डिप्लोमाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत परिणाम झाल्याचे दिसून आले. ऑफलाइन परीक्षा बहुपर्यायी प्रश्न नसल्यामुळे विस्तृतपणे उत्तरे लिहायची होती. दोन वर्षात सराव नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी विस्तृत उत्तरे लिहिली नाहीत. सोपे असलेलेच प्रश्न सोडवले परिणामी त्यांच्या गुणांवर फरक पडला आहे. तोंडी परीक्षेत ९० टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी लेखीमध्ये ५५ टक्क्यांपर्यंतच पोहचू शकले. विद्यार्थी नापास होण्याच्या प्रमाण १० टक्क्यांनी वाढले. तसेच गुण मिळवण्याच्या प्रमाणातही सुमारे १० ते १५ टक्के घट झाली आहे.
या प्रमुख गाेष्टीमुळे गुणवत्तेचा आलेख घसरला
ऑफलाइन परीक्षेचा कालावधी तीन वरुन चार तास केला होता. वाढवून दिलेल्या एका तासाचा उपयोग विद्यार्थ्यांनी केला नाही. अभ्यास करणे, लिहिण्याचा सराव नसल्यामुळे अनेक जण दोन-अडीच तासातच पेपर सोडवून बाहेर पडले.
न्युमेरीकल प्रश्नांना सोडवण्यासाठी वापरले जाणारे फॉर्मुले विद्यार्थ्यांना पाठ नव्हते. परिणामी अनेकांनी हे प्रश्न सोडवलेच नाही. फक्त सोपे प्रश्न सोडवले. उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांच्या लक्षात ही बाब आली आहे.
महाविद्यालये बंद असताना प्राध्यापकांनी ४५ मिनिटांचे व्हिडीओ तयार करुन विद्यार्थ्यांना लेक्चर्स उपलब्ध करुन दिले होते; परंतु विद्यार्थी १० ते १५ मिनीटेच लेक्चर ऐकत हाेतेे. ऑफलाइन अभ्यासक्रम गांभीर्याने घेतला नाही.
विद्यार्थ्यांनी नकारात्मकतेवर मात करावी
ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत. ऑफलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांचा नापास होण्याचा टक्का वाढला आहे. कॉपी केल्याचे प्रकारही उघड झाले आहेत. येणाऱ्या काळात ही नकारात्मकबाब पूर्णपणे बदलण्यासाठी प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहेेत.
- डॉ. आशिष विखार, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव
ऑनलाइन कॉपीचे प्रमाण वाढले
ऑनलाइन परीक्षेत मोबाइलच्या कॅमेरात न दिसता शेजारी बसलेल्या इतरांनी विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी बहुपर्यायीमधून एक पर्याय निवडून घेत सोपस्कार केले. हे प्रकार सुपरव्हिजन करणाऱ्या प्राध्यापकांच्या लक्षात आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना कॉपी करताना विद्यार्थ्यांना हटकले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.