आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषीप्रधान असलेल्या देशात विद्यार्थ्यांवर शाळेतच शेतीचा संस्कार रुजवला जावा, या संस्कारातून कृषी शास्त्रज्ञांची फळी निर्माण व्हावी यासाठी फाली (फ्युचर अॅग्रीकल्चर लीडर्स अॉफ इंडिया) ही संस्था कार्य करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र व गुजरातमधील ६७ शाळांमधील बाल कृषीसंशोधकांनी शेतीला ‘स्मार्ट फार्मिंग’ करणारे विविध आविष्कार साकारले आहेत.
जैन हिल्स येथे आयोजित दोनदिवसीय फाली कृषी विज्ञान संमेलनात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील ६७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी शेतीशी संबंधित शोध सादर केले. हे सर्व विद्यार्थी आठवी आणि नववीत शिकणारे आहेत. दैनंदिन शेतीच्या कामांमध्ये शेतकऱ्यांना उपयोगी ठरतील अशी उपकरणे आणि आयडिया अत्यंत कमी खर्चात साकारल्या होत्या. फालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शेतीशी संबंधित अत्यंत उपयोगी असे संशोधन सादर केले आहे. उच्च तंत्रज्ञानांवर आधारित काही आयडिया हैराण करणाऱ्या आहेत. हेच उद्याचे कृषी संशोधक ठरतील.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या कार्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे यूपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. तर शाळेत इतर विषयांप्रमाणे शेती हा विषय असला पाहिजे असे वाटते. फालीच्या माध्यातून तसे प्रयत्न सुरू आहेत. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे प्रशिक्षण, रोजगारांच्या संधी, इंटरशिपसह अनेक प्रकारे सहाय्य दिले जात असल्याचे गोदरेज समूहाचे संदीप सिंग यांनी सांगितले. फालीच्या व्हाइस चेअरमन नॅन्सी बेरी, सान्ड्रा श्रॉफ, व्यवस्थापक रोहिणी घाटगे उपस्थित हॉत्या. सध्या २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत असलेला हा उपक्रम २०३१पर्यंत अडीच लाखांवर पोहचवण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हे आविष्कार पोहोचल्यास त्यांनाही प्रेरणा मिळेल व तेही असे प्रयोग करतील.
कांदा कापणी ते ऑटोड्रिप सिस्टिम
संशोधक विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेल्यामॉडेलमध्ये कांदा काढणीनंतर बॅटरीवरील स्वयंचलित कापणी यंत्र, सोलरवरील ग्रास कटर, शेतीसह जोडधंदा म्हणून मिक्स फार्मिंगची आयडिया देणारेमॉडेल, गोठ्यातील शेण जमा करणारे यंत्र, मका सोलणी, रबरी पाइप, ठिबक नळ्या गुंढाळणी यंत्र, सोलर, बॅटरीवर चालणारे फवारणी यंत्र, सायकलवरील फवारणी यंत्र, स्वयंचलित पेरणी, वखरणी यंत्र, फळ तोडणीसह शेताला अॅटोमोटिव्ह पद्धतीने पाणी देणारे सेन्सार या विविध शोधांचा समावेश हॉता.
विद्यार्थ्यांनी सादर केला बिझनेस प्लॅन
जैन हिल्स येथील परिश्रम हॉल, बडी हांडा हॉल व गांधीतीर्थ ऑडिटोरियम येथे ६७ शाळांमधील २५० विद्यार्थ्यांनी बिझनेस प्लॅन सादर केले. केळी, लाल मिरची पावडर, नीम बी अॅबस्ट्रॅक्ट, कवठापासून कलाकंद, मशरूम, जिरेनियम तेल उत्पादन, जिरेनियम शेती व प्रक्रिया, सोयाबीनपासून उत्पादने, कुत्र्यांसाठी केळीचे बिस्कीट, उसाचा जाम, नर्सरी, कोबीचे उत्पादन, टोमॅटो कॅचप, आयुर्वेदीक औषधी, हळदीचे लोणचे, करवंद लोणचे. तांदळापासून कुरकुरीत कुकीज, अॅग्री टुरिझम, वाइन बनवणे, शेवगा शेती उत्पादने, च्यवनप्राश, आयुर्वेद तेल, पोल्ट्री, पांढरा कोळसा बनवणे, शेंगदाणा चिक्की व विक्री, ड्रॅगन फ्रूट फार्मिंग, सूर्यफूल शेती, संत्रापासून फेस, मधमाशीपालन या प्लॅनचा समावेश होता.
शेतीचा संस्कार रुजवण्याचा प्रयत्न
शेती हा केवळ व्यवसाय नाही. शेती हा मानवी जीवनाचा प्रमुख आधार आहे. पुढच्या पिढीत शेतीचा संस्कार रुजवणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे हेच वय योग्य आहे. या वयात त्यांना शेतीची आत्मीयता वाढली तर आयुष्यभर शेतीची नाळ तुटत नाही. पुढे जाऊन हे विद्यार्थी कृषीक्षेत्रातच मोलाचे योगदान देऊ शकतात. या कार्यासाठी पुढे आलेल्या आठ कंपन्यांनी पाठबळ दिले आहे. या कार्याला चळवळ,सहज संस्काराचे रूप यावे हा प्रयत्न आहे.
अशोक जैन, अध्यक्ष: जैन उद्योगसमूह
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.