आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजमिनीवर मजबूत गोल पिरॅमिड करून एकावर एक असे सहा थर रचून त्यावर गोविंदाला चढवून ३० फुटांपेक्षा अधिक उंचीची दहीहंडी फोडण्याचा सराव शहरातील तरुण कुढापा मंडळाने सुरू केला आहे. यंदा सहा थराचे लक्ष्य मंडळाने ठेवले आहे. बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवाच्या तयारीला या कार्यकर्त्यांनी रंग भरला आहे. शाळा नंबर ३मध्ये हा सराव सुरू आहे. शहरातील अन्य मंडळांच्या गोविंदांनीही सराव सुरू केला आहे.
राज्य शासनाने या वर्षी गोकुळाष्टमी व गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गाेविंदा पथकांनी तयारी सुरू केली आहे. शहरातील चार ते पाच प्रमुख ठिकाणी मानाची दहीहंडी फाेडली जाते. मानाच्या दहीहंड्या फोडून नावलौकिक मिळवलेल्या तरुण कुढापा मंडळाचे हे ५९वे वर्ष आहे. त्यांनी अपवादात्मक परिस्थिती वगळता या परंपरेत खंड पडू दिलेला नाही. दहीहंडी फोडताना किरकोळ दुखापत वगळता अद्यापपर्यंत दुर्घटना घडली नसल्याचे कार्यकर्ते सांगतात.
मानाच्या १० दहीहंडी फोडण्याचा विक्रम
दहीहंडीच्या दिवशी चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांचा जथ्था सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत जळगाव शहरातील नवीपेठ, अयोध्यानगर, पिंप्राळा या मानाच्या व अन्य विविध भागातील १० ते १२ दहीहंड्या फोडतात. यात सहभागी सर्व गोविंदांसाठी वाहनाची व्यवस्था करावी लागते. यातून मिळालेली देणगी ही गणेशोत्सवाच्या उपक्रमात वापरली जात असल्याचेही मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
एक दिवसाचा काढतात लाखाचा विमा
नागपंचमीचा मुहूर्त साधून कार्यकर्त्यांनी सरावाला सुरुवात केली. उत्साही युवकांच्या या कार्यात विविध राजकीय पदाधिकाऱ्यांकडून मदत केली जाते. त्यात गोविंदांचा विमा काढणे, टी शर्ट, भोजन, नाष्टा उपलब्ध करून देण्याचेही कार्य केले जाते, असे मंडळाचे कार्यकर्ते सांगतात. गोविंदांना जखम अथवा दुर्घटना घडल्यास प्रत्येक कार्यकर्त्याचा एक लाखाचा विमा राजकीय पदाधिकारी काढतात. किंबहुना, स्वखर्चाने प्रथमोपचार साहित्य जवळ ठेवावे लागते.
चार दिवसांपासून दहीहंडीचा सराव सुरू आहे. पाच थर यशस्वी रचले. आता सहा थरांचा सराव दरराेज तीन ते चार तास करीत आहोत.गोकुळाष्टमीला परवानगी घेऊन शहरातील मानाच्या दहीहंडी फोडण्याचे आमचे नियोजन आहे. हितेश वाणी, अध्यक्ष: तरुण कुढापा मंडळ, जळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.