आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लग्नसराईमुळे मे-जून महिन्यात राज्यात 2,500 कोटींच्या उलाढालीची शक्यता, दोन वर्षांनंतर बाजारात तेजी

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा प्रथमच लग्नसोहळे जल्लाेषात होताना दिसताहेत. राज्यात मे-जून या दोन महिन्यांत सुमारे अकराशे ते बाराशे विवाह सोहळे होणार आहेत. या माध्यमातून सुमारे २५०० कोटींची उलाढाल होण्याचा दावा काॅन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) संघटनेने देशव्यापी सर्व्हेतून केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार महाराष्ट्रात २५ एप्रिलपासून ते आतापर्यंत सुमारे ८०० कोटींची उलाढाल झाली आहे. आगामी दोन महिन्यांत हा आकडा २५०० कोटींवर जाईल. त्याचा अंदाज जळगावसह राज्यभरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेला अक्षय्य तृतीया सण, रमजान ईदला बाजारपेठेत खरेदीसाठी झालेल्या गर्दीतून आला आहे.

भेटवस्तूंसाठी एसी, फ्रिज, कूलरला पसंती
लग्न समारंभात पारंपरिक भेटवस्तू देण्याची प्रथा मागे पडून जीवनावश्यक वस्तू, आधुनिक गॅजेट, निकडीच्या बाबी देण्याचा कल वाढला आहे. यामुळेच एअर कंडिशनर, फ्रिज, कूलर आदी दैनंदिन इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत वाढ होत आहे. आगामी दोन महिन्यांत इलेक्ट्रॉनिक मार्केटची उलाढाल दुपटीने वाढून ५० वरून शंभर कोटींपर्यंत पोहोचेल, असा अंदाज जोशी सेलचे कौशल जोशी यांनी व्यक्त केला.

५ हजार कार अन‌् ५० हजार दुचाकींची विक्री
महाराष्ट्र ऑटोमोबाइल असोसिएशनचे सदस्य अशोक बेदमुथा यांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन वर्षांत कार उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनातील घट कमी होत आहे. लग्नसराईत राज्यात पाच ते सात हजार कारची विक्री होऊ शकेल. हीच काहीशी स्थिती दुचाकी वाहनांबाबत आहे. सुमारे ५० हजार दुचाकीची विक्री होऊ शकते असा अंदाज पगारिया ऑटो मोबाइलचे पुखराज पगारिया यांनी व्यक्त केला आहे.

डेस्टिनेशन मॅरेजसाठी दुसरी पसंती
‘कॅट’च्या सर्व्हेनुसार राज्यात दोन महिन्यांत सुमारे १२०० विवाह सोहळे होतील. देशात महाराष्ट्र हे सर्वाधिक फाइव्ह स्टार हॉटेल असणारे तसेच राजस्थान आंतर डेस्टिनी मॅरेजसाठी पसंती दिले जाणारे राज्य आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विवाह सोहळे हे अधिक समृद्ध असतात. त्यात होणारी उलाढाल ही २२०० ते २५०० कोटींच्या घरात असेल. -पुरुषोत्तम टावरी, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट, महाराष्ट्र

७० टक्के खरेदी फक्त लग्नांसाठी कापड बाजारात वर्षभराच्या तुलनेत लग्नसराईच्या दोन महिन्यांत होणारी विक्री जवळपास ६० ते ७० टक्के असते. दोन वर्षांनंतर धूमधडाक्यात लग्नाला परवानगी असलेले हे वर्ष आहे. ज्याप्रमाणे निर्बंध हटवल्यानंतर इतर सणांना प्रतिसाद लाभतो आहे, त्याचा अंदाज घेतला असता आगामी दोन महिन्यांत असणाऱ्या लग्नाच्या तिथींची संख्या बघून कापड मार्केटमध्ये मोठी विक्री होईल. जळगावात नव्हे तर राज्यभरात कापड मार्केटला या कालावधीत तेजी राहील, अशी आशा फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतनी यांनी व्यक्त केली आहे.

जळगावात अक्षय्य तृतीयेला झालेली गर्दी.

बातम्या आणखी आहेत...