आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबोदवड तालुक्यातील राजूर गावात लक्ष्मी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या १० सदस्यांनी तीन वर्षांपासून नैसर्गिक रंग तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे यंदाचे हे त्यांचे तिसरे वर्ष आहे. मक्याच्या पिठाचा वापर हे नैसर्गिक रंग तयार करताना केला जातो. त्यामुळे त्वचेला अपाय होत नसल्याने या नैसर्गिक रंगांना तालुक्यात व परिसरात वाढती मागणी आहे. लक्ष्मी स्वयंसहायता हा बचत गट गेल्या तीन वर्षांपासून होळी व रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक रंग तयार करून त्याची विक्री करत आहे. या माध्यमातून दहा महिलांनी ५० किलो मक्याच्या पिठाचा वापर करून आकर्षक असे लाल, हिरवा, पिवळा व नारंगी रंग तयार केले आहेत. हे रंग नैसर्गिक व हरबल असल्याने चुकून नाका तोंडात गेल्याने त्याचा कोणताही त्रास होत नाही. तसेच डोळे व त्वचेवरदेखील या रंगाचा विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे या नैसर्गिक रंगांना पसंती मिळून मागणी वाढत आहे.
लक्ष्मी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सविता शेळके, सचिव विद्या पाटील, वैशाली शेळके, सदस्या उषा शेळके, सीमा शेळके, विजया शेळके, देवकाबाई शेळके, अर्चना शेळके, कविता शेळके या महिला नैसर्गिक रंग तयार करण्याचे काम करत आहेत. या कष्टातून रंग विक्रीतून ४० हजारांचा नफा मिळणार आहे. नैसर्गिक व हर्बल रंग असल्याने या रंगाला मागणी वाढत आहे व मागणीनुसार पुरवठा केला जात आहे.
नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी राजूर येथील शिक्षक किशोर शेळके यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत कुमार काथेपुरी व तालुका अभियान व्यवस्थापक संदीप मेश्राम यांनी व्यवसाय वाढीसाठी महिला बचत गटाला योग्य मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. या महिला बचतगटाच्या उपक्रमातून दहा महिलांना घरबसल्या स्वयंरोजगार मिळाला. त्यांची प्रेरणा इतर महिला बचत गटांनी घ्यावी, असे आवाहन गटविकास अधिकारी यांनी केले आहे
मागणी वाढत आहे
^आम्ही लक्ष्मी बचत गटाच्या माध्यमातून नैसर्गिक रंग तयार करण्याचे काम गेल्या ३ वर्षांपासून करत आहोत. यावर्षीदेखील नैसर्गिक रंगांना तालुका व परिसरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पण वेळेच्या अभावी मागणी पूर्ण करण्यास अडचणी आहेत. पुढील वर्षी सुरुवातीपासूनच योग्य ते नियोजन करून पुरवठा करण्यात येईल.’
- सविता शेळके, अध्यक्षा, लक्ष्मी बचत गट, राजूर, ता. बोदवड, जळगाव
तेच बनले उत्पन्नाचे साधन
राजूर गावात बचत गटाच्या पुढाकाराने १० महिलांना मिळाला रोजगार
होळी व रंगपंचमीसाठी महिलांनी विक्रीसाठी ५० ग्रॅम वजनाची १००० पाकिटे केली आहेत. लक्ष्मी महिला बचत गटाने ५० हजारांचा कच्चा माल जालना येथून मागवला. या बचत गटाला या वर्षी रंग विक्रीतून ४० हजारांचा नफा होणार आहे. आठ दिवसांपासून ६५ हजार रुपयांच्या रंगाची विक्री झाली आहे. यंदा ८० हजार रुपयांच्या रंगाची विक्री अपेक्षित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.