आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू हाेणार, महापाैरांनी दिले संकेत

जळगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खाेटेनगर, निमखेडीसह आव्हाणे गावांसाठी त्रासदायक ठरलेल्या घनकचरा प्रकल्पाचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. मक्तेदाराचे आठ महिन्यांपासून थकवलेले २२ लाखांचे बिल अदा करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.त्यामुळे वाढीव दराबाबत मक्तेदारासाेबत वाटाघाटी करून कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महापाैर जयश्री महाजन यांनी दिली.

शहरानजीकच्या आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्पात गेल्या ८ वर्षांपासून कचऱ्याचे केवळ डंपिंग सुरू आहे. त्यावर प्रक्रिया हाेत नसल्याने कचऱ्याचे डाेंगर तयार झाले आहेत. प्रकल्पस्थळी सद्य:स्थितीत साडेतीन लाख क्युबिक मीटर कचरा पडून आहे. आतापर्यंत या कचऱ्यावर प्रक्रियाही झालेली नाही. दरम्यान घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू हाेण्याच्या प्रतीक्षेत आहे.

मनपाने फेब्रुवारी महिन्यापासून २२ लाखांचे बिल राेखले हाेते. त्यामुळे २५ काेटींचा प्रकल्प सुरू हाेऊ शकलेला नाही. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केले हाेते. त्यानंतर प्रशासनातील हालचालींना वेग आला आहे. आयुक्त डाॅ. विद्या गायकवाड यांनी स्वत: या विषयात लक्ष घातले आहे. तसेच महापाैर महाजन यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला आहे. यासंदर्भात महापाैर आणि आयुक्तांच्या बैठकीत महापालिका प्रशासनाने २२ लाखांचे राेखलेले बिल अदा करण्याची तयारी दाखवली आहे. येत्या दाेन, तीन दिवसांत बिल अदा झाल्यानंतर मक्तेदार लक्ष्मी एंटरप्रायजेस या कंपनीच्या संचालकांना चर्चेसाठी पाचारण केले जाणार आहे.

लाेखंडाचे दर कमी झाल्याने दिलासा : मक्तेदाराने काेराेना काळात लाेखंडाचे दर वाढल्याने डीपीआरच्या रकमेपेक्षा १ काेटी ३७ लाख वाढीव देण्याची मागणी केली हाेती. दरम्यान, लाेखंडाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे वाढीव खर्चाची रक्कम ७० लाखांपर्यंत येण्याची शक्यता आहे. मक्तेदाराशी वाटाघाटी करून वाढीव खर्च शासनाच्या मार्गदर्शनानुसार अथवा महापालिकेच्या फंडातून देण्याची तयारी केली जात आहे. असे झाल्यास महिनाभरात कामाला सुरुवात हाेऊ शकते, असे देखील संकेत प्रशासनाकडून दिले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...