आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात महापालिकेकडून शहराच्या वाढीव वस्तीत पाणीपुरवठा व राहून गेलेल्या भागात मलनिस्सारण याेजना अमृत याेजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राबवण्यात येणार हाेती. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याची मुदत २६ डिसेंबर २०२२पर्यंत हाेती. मात्र, त्याकडे दुुर्लक्ष झाल्याने या टप्प्यातून जळगाव वगळले जाईल हे स्पष्ट आहे. अर्थात, या कारणाने आता मलनिस्सारण याेजनेसह विस्तारित भागातील जलवाहिनी व पाच जलकुंभांचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
जळगाव शहरात अमृत २.० अभियानांतर्गत शहरातील पाणीपुरवठा, मलनि:स्सारण व सरोवराचे पुनरुज्जीवन बाबतचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प १२०० कोटी रुपयांचा आहे. केंद्र शासनाच्या शिखर समितीकडून त्याला मंजुरी मिळाली आहे. मंजुरी मिळून तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. अहवालास तांत्रिक मान्यता घेऊन प्रकल्प अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश हाेते. पण त्याकडे लक्ष दिले गेलेले नाही.
अहवाल पाठवण्यात दिरंगाई
महापालिकेतर्फे मुदतीत अहवाल तर गेलाच नाही; परंतु अद्याप अहवाल तयार करण्यावरून वाद सुरू आहे. त्यामुळे सध्या शासनाच्या या पत्रावरून जळगाव शहर या अभियानातून वगळल्याचे स्पष्ट हाेते आहे. त्याचा मोठा फटका बसणार आहे. आयुक्तपदाचा वाद आणि पदवीधर निवडणूक आचारसंहिता यामुळेच पेच निर्माण झाला आहे.
पुन्हा समावेशासाठी द्यावे लागेल सबळ कारण
दुसऱ्या टप्प्यातील याेजना वगळली गेल्यास शहराच्या उर्वरित ६० टक्के भागात मल्लनिस्सारण याेजना राबवणे बाकी आहे. त्याचप्रमाणे विस्तारित भागात पाणी पुरवठा याेजनेसाठी पाइपलाइन टाकणे, नवीन चार ते पाच जलकुंभ उभारीची कामे लांबणीवर पडण्याची शक्यता.
अमृत याेजना २.० मधून जळगाव महापालिकेला वगळण्यात आले तर या योजनेत पुन्हा सामाविष्ट होण्यासाठी शासनाला विनंती करावी लागेल. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाच प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी महापालिकेला सबळ कारण शासनाला द्यावे लागेल.
ताेपर्यंत रस्त्यांची कामे करा
शहरात राज्याकडून मिळालेल्या निधीतून रस्त्यांची कामे हाेत आहेत. त्यात अमृत याेजनेची कामे बाकी असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांची काम थांबवण्यात आलेली आहेत. आता या याेजनेच्या कामाला उशीर हाेणार असल्याने किमान या भागातील रस्त्यांची कामे करणे अपेक्षित आहे.
काय म्हटले आहे पत्रात?
नगरविकास विभागातर्फे जळगाव महापालिकेला पत्र पाठवण्यात आले होते. महापालिका आयुक्त देविदास पवार यांच्या कार्यकाळात हे पत्र आले होते. या पत्रावर तारीख टाकलेली नाही. मात्र, डिसेंबर २०२२ पूर्वीच हे पत्र आले आहे. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांच्या स्वाक्षरीनिशी हे पत्र देण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेत अमृत २.० अभियानांतर्गत गठीत राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी सविस्तर प्रकल्प अहवाल २६ डिसेंबर २०२२ पूर्वी सादर न केल्यास वगळण्यात येईल व त्याची जबाबदारी आयुक्तांवर निश्चित करून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.