आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शहरात पाेलिसांना काम लावायला गेलेला तरुण स्वत:च झाला चतुर्भुज

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शहरातील प्रमुख चौकात उघड्यावर गाडीत बसून काही जण दारू पीत आहेत. परवानगी नसताना मेडिकल स्टोअर्समध्ये स्नॅक्स विक्री केली जाते’ असा फोन करून पोलिसांना कामाला लावण्याच्या उद्देशाने ११२ या क्रमांकावर फोन करणारा तरुण स्वतः त्यात अडकला. या प्रकरणी राहुल अशोक जैन या ३३ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

पाेलिस नियंत्रण कक्षात नागरिकांच्या मदतीसाठी ११२ क्रमांकाची सुविधा आहे. त्याच्यावर रविवारी रात्री दीड वाजता आकाशवाणी चौकात उघड्यावर मद्यपान हाेत असल्याचा फाेन आला. नियंत्रण कक्षाने ही माहिती वायरलेसला दिली. रामानंद पोलिस ठाण्याचे चेतन अहिरे हे रामदास काॅलनीत गस्तीवर होते. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किशोर पवार हे पेट्रोलिंगला निघाले होते. दोन्ही पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना चौकात एमएच १९ डीजे ५९५१ या क्रमांकाची गाडी उभी दिसली.

त्यात विठ्ठल भागवत पाटील (रा.अयोध्यानगर) व गौतम यशवंत पानपाटील (रा.पिंपळा) हे बसलेले हाेते. पोलिसांनी चौकशी केली असता मद्यपान करत नव्हते. गाडीत शोध घेतला असता मद्य आढळले नाही. या ठिकाणी राहुल अशोक जैन (वय ३३, रा. प्रभात कॉलनी) हा उभा होता. विचारपूस केली असता तो नशेत हाेता व त्याने आपणच फोन केला असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल केला.

मनात पाेलिसांबद्दल आकस म्हणून केला हाेता फाेन
राहुल जैन विरुद्ध दीड वर्षांपूर्वी जिल्हापेठ पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्याबद्दल त्याच्या मनात पोलिसांबद्दल आकस आहे. त्याने आयजी ऑफिसकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांना जबाब देण्यासाठी नाशिक येथील आयजी ऑफिसला जावे लागत होते. ‘आपल्या तक्रारीवरून पोलिसांना काम लागले’ ही भावना त्याच्या मनात तयार झाली हाेती. यातूनच त्याने रविवारी खोटी माहिती देऊन पोलिस दलाला काम लावण्याच प्रयत्न केला; परंतु त्यात तो स्वतःच अडकला.

बातम्या आणखी आहेत...