आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयत्न:तरुणांनी सात किलोमीटरपर्यंत पाठलाग; ट्रॅक्टर चोरट्याने पाठलाग करणाऱ्या तरुणांना चिरडण्याचा केला प्रयत्न

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यरात्री घराबाहेरून ट्रॅक्टर चोरून पळून जात असलेल्या चोरट्याचा गावातील काही तरुणांनी सात किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. ही बाब लक्षात येताच चोरट्याने जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात ट्रॅक्टर रिव्हर्स घेऊन तरुणांना चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यात तरुण बचावले. यानंतर त्यांनी चोरट्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रविवारी मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान हा थरार घडला.

अतुल दिनकर सपकाळे (वय ३६, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) यांच्या मालकीचे हे ट्रॅक्टर आहे. तर राकेश अंजनिया चव्हाण (वय २५, रा. खुजाम्बा, ता. भगवानपूर, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे चोरट्याचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री एक वाजता राकेश याने अतुलच्या अंगणात उभे असलेले ट्रॅक्टर सुरू करून पळ काढला. गावातील चौकात काही तरुणांनी ट्रॅक्टर अतुलचे असल्याचे ओळखले. पण चालवणारा तरुण अनोळखी असल्याने त्यांना संशय आला.या तरुणांनी तत्काळ अतुलला फोन करून माहिती दिल्यानंतर ट्रॅक्टर कोणीतरी चोरून नेत असल्याची खात्री झाली.

सुदैवाने गावातील एका ठिकाणी मोठी चारी खोदलेली असल्याने चोरट्याला रस्ता बदलवावा लागला. यामुळे अतुलसह पंकज सपकाळे, भूषण सपकाळे, शुभम सोनवणे, अमोल सपकाळे, देवेंद्र सपकाळे, चेतन सोनवणे, अजय तायडे, राहुल कोळी यांच्यासह काही तरुणांनी दुचाकी, चारचाकीने ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला. चोरट्याने आव्हाणे मार्गे ट्रॅक्टर जळगाव शहराकडे वळवले. महामार्गावरून भरधाव येत त्याने दुचाकी, चारचाकीला पुढे येऊ दिले नाही. अखेर शिवाजीनगर दालफड भागात त्याची गोची झाली.

अरुंद रस्ता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे ट्रॅक्टरची गती कमी झाली. यामुळे पाठलाग करणारे तरुण ट्रॅक्टरच्या मागे पाेहोचले. पकडले जाण्याच्या भीतीने चालक राकेश याने अर्जंट ब्रेक मारून ट्रॅक्टर उभे केले. यानंतर रिव्हर्स गिअर टाकून गतीने मागे येण्याचा प्रयत्न केला. तरुणांनी रस्त्याच्या कडेला मिळेल त्या जागेवर आश्रय घेतल्यामुळे सुदैवाने हे तरुण बचावले.

आता ट्रॅक्टर पळवण्यात काहीच संधी नसल्यामुळे राकेशने उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी अतुलने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी पहाटे तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी राकेशला अटक केली आहे. पोलिस कर्मचारी अनिल फेगडे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...